राहुरीच्या कन्येने सर केला साडेसहा हजार मीटर उंच पर्वत


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महामार्ग पोलीस खात्यातील आपली अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळून हिमालय पर्वत रांगेतील मेरा पीक या पर्वतावर मूळच्या राहुरीतील महिलेने पाय ठेवला. 6 हजार 476 मीटर उंची सर करणे सोपे नव्हते. साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या द्वारका डोखे यांनी गिर्यारोहणाचा छंदही व्यस्त नोकरीतून जोपासला आहे. 13 जूनला रात्री साडेतीन वाजता नगरच्या या हिरकणीने हिमालयातील पर्वतरांगेत हिंकू व्हॅलीतील मेरा पीकच्या माथ्यावर तिरंग्याबरोबर महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज फडकावला. 


Loading...
बेंगलोरच्या युई रॅंम्बलर्स या गिर्यारोहक संस्थेने या ट्रेकिंगचे आयोजन केले होते . 3 जूनपासून सुरू झालेल्या या ट्रेकिंगमध्ये द्वारका यांच्यासह सात जणांनी सहभाग घेतला होता. दोन गाईड व 4 मदतनीसांची सोबत त्यांनी घेतली होती. यात लुक्‍ला (2 हजार 800 मीटर), चुतांगा (3 हजार 500 मीटर), खरकी टॅंग (4 हजार मीटर), जमालापास (4 हजार 600 मीटर), छत्रबू (4 हजार 200 मीटर), कोठे (3 हजार 600 मीटर), यांगना (4 हजार 200 मीटर), खारे (4 हजार 900 मीटर), बेस कॅम्प ( 5 हजार 400 मीटर), हायकॅम्प (5 हजार 800 मीटर), मेरा पीक (6 हजार 740 मीटर) असे ट्रेकचे 11 टप्पे होते. 

कोठे येथे एकाचे स्वास्थ्य खराब झाल्याने उर्वरित सहा जणांनी पुढचा प्रवास सुरु केला. हायकॅम्पनंतर चार जणांनीच पुढे जाण्याचा निर्णय घेतला, परंतु दोघांनी माघार घेतल्याने सर्वजण माघारी फिरले. द्वारका यांना अंतिम टप्प्यात असलेले मेरापीक शिखर खुणावत होते. कोणत्याही परिस्थितीत ही चढाई यशस्वी करायची, अशी खुणगाठ मनात बाळगून त्यांनी पुढे जाण्याचा निर्धार केला. यासाठी क्‍लायबिंग शेरपा फुरी यांना वारंवार विनवावे लागले. अखेर त्यांनी संमती दिल्यानंतर द्वारका यांचा शेरपा फुरी व पोर्टर रोहीत समवेत प्रवास सुरु झाला. 12 जूनला सकाळी 11 वाजता ते कोठे येथून निघून सायंकाळी 5 वाजता हाय कॅम्पला पोहोचले . 


थोड्याशा विश्रांतीनंतर रात्री साडेनऊ वाजता मेरापीक साठी चढाई सुरू केली. फुरी पुढे चालताना वाटेतील बर्फाच्या लहानमोठ्या चिरांना हातातील पोलस्टीकच्या साहाय्याने शोधून रस्ता रस्ता सुरक्षित करत होता. सुरुवातीला लहान वाटत असलेल्या चिरा नंतर मोठमोठ्या होत होत्या. त्यामुळे मनात भिती होतीच, परंतु त्यांचा दृढ निश्‍चय त्यांना पुढे घेऊन जात होता. अखेर रात्री साडेतीन वाजता हे तिघे मेरापीकवर पोहोचले . यावेळी तापमान उणे 19 ते 21 दरम्यान होते. या रक्‍त गोठवणाऱ्या थंडीत द्वारका यांनी तिरंगा व महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज फडकावला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.