भारताचा मालिका विजय, इंग्लंडवर ७ गडी राखून मात


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रोहित शर्माचे तडाखेबंद शतक आणि हार्दिक पंड्याच्या (३३) फटके बाजीवर भारताने ट्वेण्टी-२० मालिकेचे (२-१) विजेतेपद पटकावले. रोहित शर्माने केवळ ५६ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांनी शतक झळकावले. 

रोहितचे ट्वेण्टी-२० च्या कारकीर्दीतले हे तिसरे शतक ठरले. या दोघांच्या फटकेबाजवीर भारताने अंतिम ट्वेण्टी-२० सामन्यात इंग्लंडवर ७ गडी राखून विजय मिळवला. 

शिखर धवन (५) तिसऱ्या षटकात बाद झाल्यामुळे भारताच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या लोकेश राहुलला साथीला घेत रोहित शर्माने डाव पुढे चालवला. या जोडीच्या फटकेबाजीवर भारतानेही इंग्लंडप्रमाणे ४.५ षटकांत धावांचे पहिले अर्धशतक धावफलकावर लावले. पहिल्या ट्वेण्टी-२० सामन्यात शतक झळकावणारा लोकेश राहुल (१९) मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. 

Loading...
२ बाद ६२ नंतर कर्णधार विराट कोहली व रोहित शर्माने किल्ला लढवला. रोहित शर्माने २८ चेंडूंत अर्धशतक झळकावले. १०.१ षटकांत भारताचे शतक धावफलकावर लागले. 

विराट-रोहित जोडीने ३३ चेंडूंत ५० धावांची भागीदारी रचली. कर्णधार कोहलीला चांगलाच सूर गसवला होता. त्याने अर्धशतक झळकावण्याच्या दिशेने कूच केली होती. मात्र, ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या धिम्या चेंडूवर तो फसला आणि त्याच्या हाती झेल सोपवत माघारी परतला.

कोहलीने २ चौकार व २ षटकारांनी ४३ धावा काढल्या. हार्दिक पंड्याने १७ व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर चौकार लगावत दडपण काहीसे दूर केले. त्याने ४ चौकार व २ षटकारांनी फटकेबाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले..

जेसन रॉयचे अर्धशतक आणि जोस बटलर व ॲलेक्स हेलच्या फटकेबाजीवर इंग्लंडने तिसऱ्या ट्वेण्टी-२० सामन्यात ९ बाद १९८ धावा उभारल्या. जेसन रॉयने ३१ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांनी ६७ धावांची खेळी सजवली. इंग्लडने १० षटकांत २ गड्यांच्या बदल्यात ११२ धावा उभारल्या होत्या. या परिस्थितीत उर्वरित षटकांत इंग्लंड दोनशे धावांचा डोंगर उभारेल, असे चित्र दिसत होते. 

मात्र, भारताकडून हार्दिक पंड्याने दमदार पुनरागमन करत चार बळी घेतले. त्याच्या कामगिरीमुळे इंग्लंडच्या धावगतीला लगाम घातला गेला. भारताने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी सलामीसाठी ९४ धावांची भागीदारी रचली. 

जेसन रॉयने कामगिरीत सातत्य राखत २३ चेंडूंत अर्धशतकाची नोंद केली. रॉय आणि बटलर या जोडीच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडच्या पहिल्या ५० धावा केवळ ४.३ षटकांत धावफलकावर लागल्या. ट्वेण्टी-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या दिपक चाहरने धोकादायक होणाऱ्या या जोडीला फोडण्यात यश मिळवले. 

त्याने ३४ धावांवर जोस बटलरच्या यष्ट्या उडवल्या. बटलर बाद झाल्यानंतर अर्धशतक झळकावणारा रॉयही फार काळ टिकू शकला नाही. हार्दिक पंड्याने १४ व्या षटकांत कर्णधार इयान मॉर्गन (६) आणि ॲलेक्स हेल (३०) यांना बाद करत इंग्लंडच्या अडचणी वाढवल्या. 

मात्र, बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टॉ यांनी अनुक्रमे १४ आणि २५ धावा काढत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. अखेरच्या चार षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी चोख मारा केला. परिणामी, इंग्लंडचे फलंदाज ठरावीक धावांच्या अंतराने बाद होत गेले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.