निवडणुकीच्या तोंडावर अण्णांनी आंदोलन जाहीर केल्याने भाजपच्या वर्तुळात चिंता !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धी (पारनेर) येथे आंदोलन करण्याचा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला आहे. 

दरम्यान, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अण्णांनी आंदोलन जाहीर केल्याने भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात हा चिंतेचा विषय बनला आहे. 

याबाबत अण्णा हजारे यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना तिसऱ्यांदा पत्र लिहून स्मरण केले आहे. या पत्रात अण्णांनी म्हटले आहे की, लोकपाल, लोकायुक्तची नियुक्ती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत २३ मार्च रोजी रामलीला मैदानावर आंदोलन केले होते.Loading...
हे आंदोलन थांबण्यासाठी केंद्र सरकारने आमच्या मागण्यांबाबत आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत या आश्वासनावर कार्यवाही न झालेली नाही. केंद्र सरकारने २ ऑक्टोबरपर्यंत हे आश्वासन पूर्ण केले नाही तर पुन्हा याच प्रश्नावर राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशारा पत्रात दिला आहे. 

या पत्रामध्ये हजारे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्यावा, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंबलबजावणी करावी, लोकपाल, लोकायुक्तांची नेमणूक करावी व निवडणुकीत पक्षीय चिन्ह न वापरता उमेदवाराचा फोटो वापरावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. 


दरम्यान, अण्णांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने भाजप नेत्यांनी धसका घेतला आहे. अण्णांनी आंदोलन टाळावे, यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्नही सुरु झाले असल्याचे बोलले जाते. अण्णांच्या आंदोलनाला अजूनही महिन्याभराचा कालावधी आहे, याकालावधीत केंद्र व राज्य सरकारकडून काय पावले उचलली जातात, यावरच बरेच काही अवलंबून आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.