भाजपाकडून समाजात जाती -धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार समाजातील जाती -धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना अच्छे दिन येणे शक्य नसल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी केला आहे. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी येथे सरपंच अमोल वाघ मित्र मंडळाच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांसमोर घुले बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुस्तुमभाई शेख होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठनेते काकासाहेब नरवडे, माजी जि. प. सदस्य शिवशंकर राजळे, युवानेते बंडू अकोलकर, बाळासाहेब भोसले, बलभीम वाघ, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Loading...
या वेळी श्री. घुले पाटील म्हणाले, गॅसचे भाव वाढले, उसाला भाव नाही, दुधाला भाव नाही, प्रत्येक निर्णय शेतकरीविरोधी असल्याने देशात व राज्यात सत्ताबदल करण्यासाठी सज्ज व्हा. मी पाथर्डी -शेवगावचा आमदार असताना विकासकामांत कधी भेदभाव केला नाही , कासार पिंपळगाव सबस्टेशनचा प्रश्न व माणिकदौंडी येथील सबस्टेशनचा प्रश्न आम्ही प्रामुख्याने मार्गी लावले. 

आता मात्र विरोधकांची काम होऊ नये म्हणून फायलीच पळवल्या जात आहेत. पाथर्डीच्या ज्या शेतकऱ्यांकडे ऊस आहे, त्यांनी घाबरायचे कारण नाही, तुमच्या उसाचे गाळप करायला ज्ञानेश्वर साखर कारखाना सक्षम आहे. ऊसगाळपात राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. 


सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असून, शेतकरीविरोधी सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. भावनेच्या आहारी न जाता शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणाऱ्यांना साथ द्या, असे आवाहन घुले पाटील यांनी केले. खंडोबा देवस्थानच्या बांधकामासाठी शंभर गोण्या सिमेंट दिल्याबद्दल घुले यांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.