विद्यार्थिनीची छेडछाड करणाऱ्या तरुणास मुलीच्या कुटुंबीयांकडून चोप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तिसगाव, ता. पाथर्डी येथील शालेय विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या कारणावरून एका तरुणाला संबंधित मुलीच्या कुटुंबीयांकडून चांगलाच चोप देण्यात आला, ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास वृध्देश्वर चौक परिसरात घडली. 

तिसगाव येथे शिक्षण घेण्यासाठी दररोज सुमारे तीन हजार विद्यार्थी येतात. शाळा सुरू होण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर अनेक टगेगिरी करणारे तरुण गावातील व बाहेरगावातील मुलींचा पाठलाग करत त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. आई -वडील शाळेला यायचं बंद करतील म्हणून अनेक विद्यार्थिनी छेडछाड झालेला प्रकार घरच्यांना सांगत नाहीत. Loading...
अशावेळी या रोडरोमिओंचं फावलं जातं. परंतु काल शाळेची मधली सुट्टी झाली होती, त्यावेळी गावातीलच एका तरुणाने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढली, मुलगी देखील गावातीलच असल्याने तिने पटकन घरी जाऊन आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. 

त्यानंतर काही वेळातच मुलीच्या नातेवाईकांनी शाळा परिसरात येऊन या तरुणाची यथेच्छ धुलाई केली. दोघेही तिसगावचेच असल्याने काही वेळाने घडल्या प्रकारावर पडदा टाकण्यात आला. 


गावातील व बाहेर गावातील मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न यापुढील काळात कोणी केल्यास त्याला तिसगावकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, छेडछाडीचे प्रकार यापुढे कदापी खपवून घेणार नसल्याचा इशारा माजी सैनिक पद्माकर पाथरे यांनी दिला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.