धनादेश न वटल्याने शिवाजी शेलार यांना कारावासाची शिक्षा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- धनादेश न वटल्याने वडार समाजाचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवाजी चिमाजी शेलार यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. ए. ए. खंडागळे यांनी दोषी धरून दोन महिने सश्रम कारावास व फिर्यादी बबन शेळके यांना नुकसान भरपाईपोटी सव्वादोन लाख रुपये देण्याचा आदेश दिला. 

या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, वडार समाजाचे माजी प्रदेशाध्यक्ष व जय बजरंग विद्यालय तसेच उच्च माध्यमिक शिक्षण संस्थेचे चालक शिवाजी शेलार यांनी त्यांचे मित्र बबन शेळके (रा. बालिकाश्रम रोड , अ. नगर) यांचेकडून त्यांच्या व्यवसायाच्या अडचणीचे निवारणाकरता सन २०१४ साली पाच लाखाची मागणी केली त्यावेळी शेळके यांचेकडे दोन लाख रुपये असल्याने त्यांनी फक्त दोन लाख रुपये हात ऊसने दिले होते. Loading...
शेलार यांनी ९ ते १० महिन्यात सदरची रक्कम परत देतो असे आश्वासन व विश्वास दिला होता. त्यानंतर शेळके यांनी शेलार यांचेकडे वेळोवेळी पैशाची मागणी करूनही त्यांनी रक्कम दिली नाही. शेवटी शेलार यांनी दि. १०/२/२०१७ रोजी नगर अर्बन बॅंकेच्या सावेडी शाखेचा दोन लाखाचा चेक शेळके यांना दिला. 

सदरचा चेक न वटल्याने शेळके यांनी शेलार यांचेविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला. या खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. ए. ए. खंडागळे यांचेसमोर झाली. 


यावेळी फिर्यादी शेळके यांचे वतीने ॲड. एकनाथ एम. गुंजाळ यांनी आर्थिक गुन्हेगारीबाबत तसेच मैत्रीच्या संबंधातील विश्वासघात व फसवणुकीबाबत शेलार यांचेविरुद्ध युक्तीवाद केला. 

न्यायालयाने सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी शिवाजी शेलार यांना दोषी धरून दोन महिन्याची सश्रम कारवासाची शिक्षा तसेच फिर्यादी बबन शेळकेला नुकसान भरपाई म्हणून २ लाख २५ हजार रुपये देण्याची आदेश केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.