नाबार्डकडून निळवंडे कालव्यांसाठी १८९ कोटी मंजूर : ना.विखे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅँक अर्थात नाबार्डने निळवंडे धरण कालव्यांच्या कामांसाठी १८९ कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जिरायती भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या निधी बरोबर नाबार्ड बँकेकडूनही निधीची उपलब्धता करावी यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत होतो. 

नाबार्डच्या योजनेत निळवंडे प्रकल्पाचा समावेश होवू शकतो असा अभिप्राय जलसंपदा विभागाच्या नागपुर येथील अभियंत्यांनी दिल्यानंतर जलसंपदा विभागाच्या उत्तर महाराष्ट्र मुख्य अभियंत्यांनी निधीचा प्रस्ताव नाबार्डकडे सादर केला होता, असे ना.विखे पाटील यांनी सांगितले.

Loading...
विधीमंडळाच्या मागील हिवाळी अधिवेशनात याबाबत आपण राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी नाबार्डचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी २९ डिसेंबर २०१७ रोजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना सविस्तर पत्र देऊन हा निधी तातडीने उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत असा आग्रह आपण सातत्‍याने धरला होता.

नाबार्डच्या योजनेत निळवंडे प्रकल्पाचा समावेश होवू शकल्याने आता सर्व प्रशासकीय बाबींचे अवलोकन करून नाबार्डने हा निधी मंजूर करण्यास हिरवा कंदील दिला असून निधी मंजूरीचे पत्रही राज्‍य सरकारला प्राप्त झाल्याने निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी १८९ कोटी रुपयांची उपलब्धता होवू शकेल. यातून धरणाच्या कालव्यांच्या कामांना सुरूवात करतात येईल असा विश्वास ना.विखे पाटील यांनी व्यक्त केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.