केडगाव हत्याकांड : आज न्यायालयात सीआयडीकडून दोषारोपपत्र दाखल होणार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव येथे मनपा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दोघा शिवसैनिकांची हत्या झाली होती. या दुहेरी हत्याकांडाला आज शुक्रवारी (दि. ६) तीन महिने पूर्ण (९० दिवसांचा कालावधी) होत असल्याने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने (सीआयडी) जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. 

त्यासाठी सीआयडीसीच्यावतीने कागदपत्राची जुळवाजुळव केली असून दोषारोपपत्राची तयारी पूर्ण झाली आहे. पुणे सीआयडीचे पोलिस उपअधिक्षक अरुणकुमार सपकाळे यांचेकडे या प्रकरणाचा तपास आहे. केडगाव येथे मनपाच्या प्रभाग क्र. ३२ (ब) मधील पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दि. ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 



Loading...
या हत्याकांडानंतर आरोपी संदिप गुंजाळ हा स्वत:हून पारनेर पोलिस ठाण्यात हजर झाला होता. या हत्याकांडप्रकरणी मयत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात आ. संग्राम जगताप, आ. अरुण जगताप, आ. शिवाजी कर्डिले यांचा समावेश असलेल्या ३० जणांसह अनोळखी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्ह्यात संदिप गुंजाळ, बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर, बाबासाहेब केदार, रवि खोल्लम, संदिप गिऱ्हे, नगरसेवक विशाल कोतकर, भानुदास कोतकर व आ. संग्राम जगताप अशा दहा जणांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तर इतर आरोपी अद्याप फरार आहेत.


सुरुवातीला या गुन्ह्याचा तपास स्थानिक विशेष पथकाकडे देण्यात आला होता. त्यानंतर मृताच्या कुटुंबियांनी उपोषण आंदोलन करून तपास पथकावर आक्षेप घेतल्याने सदरचा तपास पुणे सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. 


या गुन्ह्याचे दोषारोपपत्र गुरुवारी (दि. ५) दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यायालय परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. परंतू सीआयडीचे पथक न्यायालयाकडे फिरकले नाही. त्यामुळे या गुन्ह्याचे दोषारोपपत्र अखेरच्या दिवशी शुक्रवारी (दि. ६) दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.