स्मार्ट श्रीरामपूरचा प्रवास विद्रूपतेकडे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्व.ज.य.टेकावडे यांच्या काळात राज्यात एक नंबर असलेल्या श्रीरामपूरचे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, मा.केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार कायम करत, 'मला बारामती श्रीरामपूरसारखी करायची' असे गौरवोद्गार काढायचे. मात्र आज त्याच पवारांच्या कार्यकर्त्याच्या ताब्यातील श्रीरामपूर स्मार्टकडून विद्रुपतेकडे जाताना बघून नागरिक अक्षरशः वैतागले आहे.

माजी आ.स्व.टेकावडे, स्व.देशमुख, माजी आ.मुरकुटे, माजी आ.स्व.ससाणे, आ.कांबळे आदींनी पालिकेची सत्ता हस्ते परहस्ते सांभाळली. सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवत टेकावडेंची शिस्त, सुसज्ज मेनरोड, स्वच्छता, भविष्यात २५ वर्षे अडचण भासणार नाही अशी पाण्याची सुविधा, टाऊन प्लॅनिंगचे नियोजन तर माजी आ.स्व.ससाणे यांच्या काळातील नवीन साठवण तलाव, उपनगरांचा विकास, जॉगिंग ट्रॅकसह अंतर्गत रस्त्यांच्या सुविधा कायम स्मरणात राहतील. 


Loading...
मात्र गेल्या वर्षभरात शहर समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. त्याचाच परिपाक म्हणून की काय, स्वच्छ भारत अभियानात सुमार कामगिरी असलेले शहर अशी नामुष्की श्रीरामपूरवर ओढवली. घन कचरा व्यवस्थापनाचा ठेका प्रति महिना १६ लाखांहून २२ लाखांवर नेऊनही अस्वच्छता कमी होण्याचे नाव घेत नाही. 

जॉगिंग ट्रॅक साफसफाई ठेका प्रति महिना ४० हजाराहून १ लाख रुपये, निर्मल भारत अंतर्गत सार्वजनिक शौचालय स्वच्छता ठेका प्रति महिना ५० हजारांहून १ लाख १० हजार रुपयांचा देऊनही स्वच्छता व साफसफाई कोठेही दिसायला तयार नाही.

महिनाभरापासून पावसामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता असतानाही धूर फवारणी, डास प्रतिबंधक औषध फवारणी अद्यापही सुरू झालेली नसल्याने पदाचा वापर फक्त झाडे लावण्याचे, वाढदिवसाचे फोटोसेशन करत टाईमपास म्हणून केला जात असल्याची भावना सामान्य नागरिकांच्या मनात घर करत आहे. शहरातील एखादा प्रभाग वगळता कोठेही रस्त्यांची कामे दीड वर्षात बघायला मिळाली नाही.

जनतेच्या समस्या दिवसरात्र वाढत असताना जिरवाजिरवी, आरोप-प्रत्यारोप करण्यात मश्गुल असलेल्या खुर्चीवरील नावापूरत्या उरलेल्या मातब्बरांना कसलेही सोयरेसुतक दिसत नाही. नाव मोठे आणि लक्षण खोटे असलेल्यांना आगामी काळात जनता घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही हेही तितकेच खरे आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.