दोन वर्षांच्या चिमुरडीचा ट्रॅक्‍टरखाली सापडून मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहत्या घराजवळच्या ओट्यावर लहान भावासोबत खेळताना, घरासमोर कृषी औजार जोडण्यासाठी मागे पुढे होणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या मागील चाकाखाली सापडल्याने दोन वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना, संगमनेर तालुक्‍यातील बोटा येथील थोरात वस्तीवर घडली.

बोटा येथील प्रविण व अरविंद सखाराम थोरात हे बंधु त्यांच्या ट्रॅक्‍टरला फण जोडण्याचे काम घरासमोरील अंगणात करीत होते. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास त्यांच्या घराच्या ओट्यावर लहान भावासमवेत खेळणारी आरोही प्रविण थोरात (वय 2 वर्ष) ही चिमुरडी खेळताना, कोणाच्याही नकळत मागे पुढे होणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या मागील चाकाखाली आली. 
Loading...

तिचे वडील व चुलत्यांनी तिला तातडीने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले, मात्र तेथे कोणीही नसल्याने, तिला खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्‍टरांनी ती मृत झाल्याचे सांगितले.
पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, पोलिस पाटील शिवाजी शेळके, घारगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट यांनी घटनास्थळी भेट दिली. 

आरोहीचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात पाठवला आहे. नजरचुकीने झालेल्या अपघातात डोळ्यासमोर मृत्यू झालेल्या आरोहीच्या वडील व चुलत्याला या घटनेमुळे धक्का बसला असून, या दुर्दैवी घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचबरोबर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याच्या घटनेमुळ ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.