संगमनेरमध्ये कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता-रोको


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पडले. नाशिक- पुणे रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करत ठिय्या मांडला. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजीही केली.

कांद्याचे बाजारभाव वाढल्यामुळे सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवार दि. ३ जुलै रोजी कांदे विकण्यासाठी संगमनेर बाजार समितीमध्ये आणले होते. पण व्यापाऱ्यांनी कमी भावाने कांदे घेण्यास सुरुवात केल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच संतप्त झाले. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत लिलाव बंद पाडले. 

Loading...

घटनेची माहिती समजताच शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी कर्मचाऱ्यांसह आंदोलनस्थळी धाव घेतली आणि शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम होते. शेवटी पोलिस उपअधिक्षक अशोक थोरात व तहसिलदार साहेबराव सोनवणे घटनास्थळी दाखल झाले. 


त्यानंतर तहसिलदार सोनवणे म्हणाले की, आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहे. परंतु पहिल्यांदा रस्ता मोकळा करा असे त्यांनी सांगितल्यानंतर तेव्हा शेतकरी रस्त्यावरुन उठले आणि थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये चर्चा करण्यासाठी आले.


यावेळी सभापती शंकर खेमनर व उपसभापती सतिश कानवडे म्हणाले की, आम्ही संपूर्ण बाजार समितीमधून माहिती घेतली आहे. कांद्याचे बाजारभाव कमी झाले आहे. त्यामुळे आपण एकत्र बसून तोडगा काढू. पण यावेळी संतप्त झालेले कांदा उत्पादक शेतकरी म्हणाले की, १९०० रुपयांचा बाजारभाव दिल्याशिवाय आम्ही जागेवरुन हलणार नाही. या निर्णयावर शेतकरी ठाम होते. 


सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत तोडगा न निघाल्याने शेवटी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गेट बंद आंदोलन केले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतिश गुंजाळ यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. ज्या शेतकऱ्यांना झालेले लिलाव मान्य नाही. 


अशा शेतकऱ्यांचे फेर लिलाव घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. जवळपास दीड तास सुरु असलेल्या या रास्ता-रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे आतोनात हाल झाले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.