दहा हजाराचा अपहार केल्याप्रकरणी आरोग्य अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सन २००८ ते २०११ या कालावधीत प्रशिक्षणाच्या खर्चामध्ये १० हजार रुपयांचा अपहार करणाऱ्या अकोला पंचायत समितीचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. संजय नेमीचंद खंडागळे यांच्याविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. संजय खंडागळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून पंचायत समिती अकोले (जि. नगर) येथे नेमणुकीस असताना आशा प्रशिक्षण व पीआरआय प्रशिक्षण सत्राच्या खर्चामध्ये स्वत:च्या अधिकारात आपल्या पदाचा दुरुपयोग करुन प्रशिक्षण कालावधीत सन २००८ ते २०११ मध्ये प्रत्येक बॅचमध्ये पूर्ण दिवस स्वत: प्रशिक्षक असल्याचे कागदोपत्री दाखविले. 

तसेच क्षेत्रीय भेटी, वेगवेगळ्या स्तरावरील बैठका, कार्यशाळा येथे उपस्थित असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असून एकाच वेळी दोन व त्यापेक्षा जास्त ठिकाणी उपस्थिती दाखवून दोन्ही ठिकाणचे मानधन, भत्ता, प्रवास भाडे असा ४ हजार २८० रुपयांचा अपहार केला. 


तसेच सन २००८ ते २००९ या कालावधीत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत घेतलेल्या पीआरआय सदस्यांच्या प्रशिक्षण सत्रांमध्ये ६ हजार ४०६ रुपयांचा असा एकूण १० हजार ६८६ रुपयांचा शासकीय निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध अकोला पोलिस ठाण्यात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असून शासकीय काम करुन देण्यासाठी कोणी शासकीय कर्मचारी पैशाची मागणी करत असेल तसेच कर्मचाऱ्याच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा जास्त मालमत्ता संपादीत केली असेल तर त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपअधिक्षक किशोर चौधरी यांनी केले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.