लोकपाल नियुक्तीसाठी दोन ऑक्‍टोबरपासून राळेगणसिद्धीत उपोषण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भ्रष्टाचारमुक्त भारत’ करण्याच्या वल्गना करणारे सरकार लोकपाल नियुक्तीसाठी मात्र टाळाटाळ करीत आहे, असा आरोप करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दोन ऑक्‍टोबरपासून राळेगणसिद्धी गावात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सरकार सत्तेत्त आले, तर लोकपालाची नियुक्ती करू, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या अन्य नेत्यांनी दिले होते; परंतु सरकार सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीचा या सरकारला विसर पडला आहे. 

Loading...
लोकपाल कायदा हा भ्रष्टाचार रोखण्याचा एक महत्वाचा पर्याय आहे, तरीही सरकार लोकपालची नियुक्ती करीत नाही, असे हजारे यांनी निदर्शनास आणले आहे. हे सरकार सत्तेवर येऊन चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे; परंतु सत्तेवर आल्यास लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती करण्याचे आश्वासन जनतेला देणारे सरकार या आश्वासनांचे पालन करीत नाही. जनता लोकपाल, लोकायुक्तांचा कायदा बनविण्यासाठी संघर्ष करीत होती, त्यावेळी सध्याच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या मंत्री सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी लोकपाल कायदा व्हावा, यासाठी कॉंग्रेसच्या सरकारच्या विरोधात आवाज उठविला होता. 

तत्कालीन सरकारच्या विरोधात लोकपाल व लोकायुक्तांच्या नियुक्तीबाबत ते काय काय बोलले, याचे संपूर्ण रेकॉर्डींग उपलब्ध आहे; परंतु आज ते लोकपाल, लोकायुक्तांविषयी काहीच बोलत नाही. लोकपाल, लोकायुक्त कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तयार केला. राष्ट्रपतींनी त्यावर एक जानेवारी 2014 रोजी कायद्यावर स्वाक्षरी केली. असे असताना कधी विरोधी पक्ष नेत्यांचा अभाव असल्यामुळे लोकपालची नियुक्ती करू शकत नाही, तर कधी कायदेतज्ज्ञाचे पद रिक्त असल्याचे कारण सांगून लोकपालांची नियुक्ती करण्याचे टाळून हेतुपुरस्सर जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप हजारे यांनी केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.