नगर-मनमाड मार्गावर तीन अपघात; एक महिला ठार, ४ जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-मनमाड महामार्गावर सोमवारी सकाळी तीन अपघात झाले. पहिल्या अपघातात साकुरी हद्दीत एका महिलेचा मृत्यू झाला. दुसऱ्या अपघातात एसटी बसचालकाने मोटारसायकलस्वारास वाचवण्याचा प्रयत्न केल्याने शिर्डीकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला धडक बसली. पानटपरीवर बस आदळल्याने टपरीचालक जबर जखमी झाला. बसमध्ये ६५ प्रवासी होते. मात्र, त्यांना इजा झाली नाही. तिसरा अपघात न्यायालयासमोर झाला. इको स्पोर्टसचालकाचा ताबा सुटल्याने वाहन जागेवर उलटून आतील दाम्पत्यास किरकोळ इजा झाली. 

Loading...
शिवाजी चौकात सकाळी साडेसातच्या सुमारास मनमाड डेपोची एसटी बसला मोटारसायकलस्वार आडवा आला. बसचालक कचरु हिरामण सोनवणे यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता बस रस्त्याच्या पलिकडील पानटपरीला धडकली. पानटपरी २० ते २५ फूट फरफटत गेली. 

पानटपरीचे मालक ऋषीकेश आहिरे गंभीर जखमी झाले. त्यांना शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बस रस्त्याच्या उजव्या बाजूला गेल्याने समोरुन येणारी स्विफ्ट डिझायर (एमएच १७ बीव्ही ५२०७) कार व बसची धडक झाली. एअर बॅग ओपन झाल्याने स्विफ्टचालक ढेसले यांना इजा झाली नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

अस्तगाव शिवारात न्यायालयाच्या इमारतीसमोर इको कंपनीच्या कार (एमएच १२ जीव्ही २६७) चालकाचा ताबा सुटल्याने ती उलटली. कारचालक व त्याची पत्नी गंभीररित्या जखमी झाले. त्यांना शिर्डी येथे हलवण्यात आले. त्यांची नावे समजू शकली नाहीत. 

रविवारी रात्री ज्ञानेश्वर पवार व त्यांची पत्नी लहानूबाई पवार (४५) सायकलवरून जात असताना मागून आलेल्या नवीन आयशर टेम्पोची धडक बसून दोघे गंभीररित्या जखमी झाले. 

जोराचा मार लागल्याने लहानूबाई मरण पावल्या. ज्ञानेश्वर यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हा टेम्पो इंदूरकडे जात होता. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.