श्रीरामपूर मध्ये लग्न लावण्याच्या बहाण्याने फसवणूक !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुली कडच्यांना ५० हजार देऊन लग्न केले, मात्र पहिल्याच दिवशी साडी घेण्याच्या बहाण्याने वधू कलवरीसह पळून गेल्याची घटना घडली आहे. 

याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कलवरी ही मुलीची आईच असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

याबाबत श्रीरामपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांगरे येथे राहात असलेल्या किशोर एकनाथ पगार (वय ३२) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की श्रीरामपूर येथील मामाच्या मुलाच्या ओळखीतील श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील आंबेडकर वसाहतीत राहात असलेला जाकीर ऊर्फ बाळासाहेब बबन पठारे हा लग्न जमवतो, असे समजले होते. 

Loading...
त्यावरून आम्ही त्याला मुलगी दाखवा असे सांगितले होते. त्यानंतर त्याने आम्हाला दि. २८ जून रोजी मुलगी पाहाण्यास बोलाविले. मी, मामाचा मुलगा, मामा, आई, भाऊ असे मुलीला पाहाण्यासाठी श्रीरामपूर येथील पठारे याच्या घरी आलो. तेथे त्याने एका मुलीला दाखविले, व तीचे नाव प्रियंका शिंदे असल्याचे सांगितले. 

तेथे दुसरी एक महिला होती, तिचे नाव अनिता शिंदे असून ती मुलीची बहीण असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. यानंतर पठारे याने लग्नासाठी ५० हजार रुपये लागतील, असे आम्हाला सांगितले. 

मामांनी ते त्याच्या हातात दिले. त्यानंतर पठारे याने प्रियंका शिंदे व तिची बहीण अनिता यांना नाशिक जिल्ह्यातील गावाकडे आणले. तेथे दुसऱ्या दिवशी सात हजार रुपयांचे अडीच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र करून लग्न केले. 

दि. १ जुलै रोजी प्रियंका हिच्या सागंण्यावरून आम्ही श्रीरामपूरला तिच्या मामांना भेटायला गेलो. प्रियंका हिने नेवासा रस्त्यावरील पडघन हॉस्पिटलसमोरील एका घरात नेले व चुलत मावशीचे घर असल्याचे सांगितले. तेथून प्रियंका दुकानातून साडी घेऊन येते, असे सांगून बहिणीबरोबर निघून गेली व परत आलीच नाही. 

त्यानंतर चौकशी केली असता या दोघींनी आपली नावे दुसरीच सांगितल्याचे लक्षात आले. प्रियंका प्रकाश रोकडे व अनिता प्रकाश रोकडे अशी त्यांची नावे असल्याचे व अनिता ही प्रियंका हिची बहीण नसून तिची आई असल्याचे समजले. 

त्यानंतर आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पठारे यास विचारणा केल असता पोलीस ठाण्यात जाऊ नका, तुम्हाला तुमची बदनामी करून घ्यायची नसेल, तर आणखी ५० हजार रुपये द्या, अन्यथा जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.  

यावरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पठारे व प्रियंका व अनिता रोकडे यांच्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. २१६/१८ नुसार भा.दं.वि. कलम ४२०, ३८४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जालिंदर लोंढे हे करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.