शंकरराव गडाख राष्ट्रवादी, भाजपच्या चक्रव्यूहात,आमदार मुरकुटे यांना यश


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा परिषद, पंचयात समितीच्या निवडणुकीच्या अगदी तीन दिवस अगोदर माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला रामराम केला तरीही या निवडणुकीत त्यांना यश मिळाले. दोन वर्षांपासून आमदार बाळासाहेब मुरकुटे विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांना कोंडीत पकडण्यात यशस्वी झाले आहेत.

Loading...
राष्ट्रवादी व भाजप पक्षाने गडाखांना चक्रव्यूहात अडकवले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाख यांचा पराभव झाला. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी चार वर्षांपासून गडाख यांच्या ताब्यातील मुळा कारखाना, मुळा शैक्षणिक संस्था, नेवासा बाजार समिती, शनेश्वर देवस्थान, मुळा बँकेसह विविध संस्था रडारवर घेतल्या. 

शासन पातळीवर तक्रारी करत त्यांच्या 'मुळा'वरच घाव घातला. यात आमदार मुरकुटे यांना यश मिळाले असले, तरी नेवासा तालुक्यातील रस्ते, वीज, पाटपाण्याचे प्रश्न सोडविण्यात त्यांना यश मिळाले नाही. 

गडाख यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात पाटपाण्यासाठी उत्तरेतील तीन कॅबिनेट मंत्र्यांशी संघर्ष केला होता. आता ते कुठल्याही राष्ट्रीय पक्षात नसल्याने त्यांना कुठल्याही मोठ्या राजकीय नेत्याचा पाठिंबा मिळत नाही. 

त्यामुळे ते एकटे पडले आहेत. ते दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश करतील की नाही, हे आज सांगता येत नाही; परंतु आज ते कसे अडचणीत येतील, यासाठी मोठे नेते प्रयत्न करत आहेत. 

व मुरकुटे यांना अगदी काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनही अंधारात मदत होत आहे. येणाऱ्या विधानसभेला भाजप पक्षाकडून मुरकुटे यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. 

राष्ट्रवादी पक्षाकडून माजी आमदार नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज आहे. घुले कुटुंबाला मानणार मोठा वर्ग नेवासा तालुक्यात आहे. जर नरेंद्र घुले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार झाले, तर मुरकुटे व गडाख यांच्यासाठी ते धोक्याची घंटा ठरू शकतात.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.