भंडारदऱ्याला पर्यटकांची पहिली पसंती, गर्दीमुळे वाहतूक कोंडीचा सामना .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भंडारदरा हे नावाजलेले आणि पर्यटनाच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाण असल्यामुळे भंडारदऱ्याला पर्यटकांची पहिली पसंती मिळत आहे. काही पर्यटक रोडच्या कडेलाच गाडी पार्किंग करत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

भंडारदरा धरणावर आणि भंडारदरा धरणाच्या रिंगरोडवर सलग आलेल्या दोन सुट्टयांमुळे भंडारदऱ्यातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडाल्याचे दिसून येत होते. तर पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे पुन्हा एकदा पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने भंडारदऱ्याला अचानक चक्काजामचे स्वरुप आले होते. 

Loading...
चक्काजामची रांग शेंडी ते रतनवाडी चेकपोस्टपर्यंत गेली होती. राजूर पोलीस स्टेशनचे पो.नि. पी.वाय. कादरी आणि त्यांचे सहकारी वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते.

वाढत्या गर्दीमुळे आणी अनेक पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा या पर्यटनक्षेत्रामध्ये पाऊस सुरु असल्याकारणाने मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहराव्यतिरिक्त अहमदनगर जिल्ह्यातूनही निसर्गप्रेमी पावसात भिजण्यासाठी भंडारदऱ्याच्या दिशेने येत आहेत. 

शनिवार आणि रविवारी भंडारदऱ्याला पर्यटकांची तुफान गर्दी होती. तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात भरणा असल्याने त्यांनी रोडवरच अस्ताव्यस्त गाड्या पार्किंग केल्याने पुन्हा एकदा वाहतूक खोळंबल्याने पर्यटकांना त्रास सोसावा लागत होता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.