आमदार शिवाजी कर्डिले दक्षिणेसह उत्तरेतील खासदार ठरवणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आमदार शिवाजी कर्डिले हे दक्षिणेसह उत्तरेतील खासदार ठरवणार, आमदार होणाऱ्यांसाठी ते विठ्ठल आहेत, विखे आणि कर्डिले आघाडी अभेद्य आहे. कर्डिले आणि माझे नाते गुरूशिष्याचे आहे, अशी स्तुती सुमने भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांनी कर्डिलेंवर उधळली. बाजार समितीच्या नवनिर्वाचित स्वीकृत संचालकांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात हे चित्र पहावयास मिळाले. 

नगर तालुका बाजार समितीच्या स्वीकृत संचालकपदी संदीप कर्डिले, कानिफनाथ कासार, जगन्नाथ मगर, रावसाहेब साठे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार आ. कर्डिले व डॉ. सुजय विखे यांनी केला. यावेळी आ.अरुण जगताप, आ. राहुल जगताप, आ. बाळासाहेब मुरकुटे,अक्षय कर्डिले, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, बबनराव पाचपुते, सुभाष पाटील, दादा कळमकर, बाजार समितीचे संचालक, तसेच जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित होते.

जनतेचे प्रश्­न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असतो. जनतेचा पुढारी म्हणून काम करतो. मी विकासात कधीही पक्षीय राजकारण आणत नाही. माझी राजकीय सुरुवात कै. खा.बाळासाहेब विखे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. विकासात राजकारण आणल्यास विकासाचे प्रश्­न बाजूला राहतात. 


Loading...
जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन काम केल्यास जिल्ह्याच्या विकासात भर पडेल. मी काही लोकसभा निवडणूक लढविणार नाही. मी राजकारणात संपत नसल्यामुळे मला माझे कारण नसतानाही ओवण्यात येत आहे. परंतु मी कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही, डगमगत नाही. जनता माझ्या विकासकांमामुळे नेहमीच माझ्याबरोबर असते, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

सुजय विखे म्हणाले की, माझा आणि आ. कर्डिले यांचा संबंध वेगळा आहे. आमच्यात वेगळे नाते आहे. मधल्या काळात या नात्यात अंतर आले होते. परंतु आता आम्ही दोघे एक विचाराने काम करीत आहोत. आम्ही दोघे पक्षाचे धोरण पाळत नाही. लोकांच्या कामापेक्षा पक्ष मोठा नाही. राहुरी कारखाना सुरू झाला तो फक्त आ. कर्डिलेंमुळे. 


पक्षाचा विचार करीत बसलो, असतो तर राहुरी कारखाना सुरू झाला नसता. जिल्ह्यातील सगळे नेते सोयीच्या राजकारणात गुंतले आहेत. पण आ. कर्डिले हे जनतेचे प्रश्­न घेऊन राजकारण करतात. आ. कर्डिले संस्था नसताना विकासाच्या जोरावर वेगवेगळ्या मतदारसंघात ५ वेळा आमदार होणे ही बाब सोपी नाही. जिल्ह्यात जनसामान्याचे नेतृत्व म्हणून आ. कर्डिलेंचे नाव घेतले जाते, असे सांगितले.

आ. राहुल जगताप म्हणाले की, आ.कर्डिले यांनी आमचा साखर कारखाना अडचणीत असताना मदत केली. आ. कर्डिले यांचा पक्षापेक्षा विकासाच्या कामात नेहमीच सहकार्य असते. ते आमचे गुरू आहेत. सर्वसामान्य माणसाला उभे करण्याचे काम केल्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागे उभी आहे. जिल्हा बँकेत त्यांच्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय घेतात.

सुभाष पाटील म्हणाले की, कै.खा. बाळासाहेब विखे व आ.कर्डिले यांच्या दोघांमध्ये काम करण्याची पद्धत सारखी आहे. पुढील उत्तर व दक्षिणचा खासदार आ.कर्डिले ठरवू शकतात. जिल्ह्यातील एक सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून ते पुढे आले आहे. 


आमच्या राहुरी मतदारसंघाचे ते आमदार झाल्याने विविध विकासाचे प्रश्­न मार्गी लागले. चांगले नेतृत्व आमच्या राहुरी मतदारसंघाला मिळाले आहे, असे सांगितले. यावेळी भानुदास बेरड, बबनराव पाचपुते, दादा कळमकर, दादाभाऊ चितळकर, अक्षय कर्डिले आदींची भाषणे झाली
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.