आयुर्वेद चौकात एकाचा बेदम मारहाणीत मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आयुर्वेद चौकात तिघांनी केलेल्या बेदम मारहाणीत एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघाही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

महेश बाळप्पा बारसे (वय ३५, रा. जुनाबाजार, माळीवाडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी आनंद एकनाथ सकट, रोहित श्रावण केदारी आणि रवी उत्तम साठे (सर्व रा. साठे वसाहत,माळीवाडा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विशाल हिरामन बारसे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मयत महेश हे विशालचे चुलते आहेत. ते कायनेटीक चौकातील लॉजवर काम करतात. आयुर्वेद चौकात आनंद सकट, रोहित केदारी आणि रवी साठे या तिघांनी महेश बारसे यांना मारहाण केली. 


डोक्यात कठीण हत्याराचा घाव बसल्याने ते जागीच ठार झाले. आयुर्वेद कॅन्टीनचे संचालक चंद्रकांत अवशीकर यांनी ही मारहाण पाहिली, पण घाईत असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत घर गाठले. महेश बारसे यांचा खून केल्यानंतर आनंद सकट, रोहित केदारी आणि रवी साठे हे तिघेही विशाल बारसेच्या घरी गेले. 


या तिघांनीच महेशचा खून केल्याचे सांगितले. त्यानुसार विशाल बारसे आयुर्वेद चौकात आले, तोपर्यंत तेथे पोलिस आले होते. महेश बारसे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, पण तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पीएसआय शिवाजी नागवे हे अधिक तपास करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.