खा.गांधींचे नगर अर्बन बँकेतील घोटाळे बाहेर काढून त्याचे पोस्टर्स शहरभर लावण्याचा इशारा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खासदार दिलीप गांधीं यांचे नगर अर्बन बँकेतील घोटाळे बाहेर काढून त्याचे पोस्टर्स शहरभर लावण्याचा इशारा सेनेकडून देण्यात आला आहे. सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील महापालिका इमारतीतील गाळेधारकांना पाठिंबा देताना खासदार गांधी समर्थकांनी, संबंधित गाळ्यांच्या ठिकाणी महापालिकेने स्वखर्चाने व्यावसायिक संकुल उभारण्याची मागणी केली व यासाठी सह्यांची मोहीमही दोन दिवसांपूर्वी राबवली. 

Loading...
यानिमित्ताने शहर शिवसेनेवर 'भ्याऊसेना, चोरसेना, फशीवसेना' अशी पोस्टर टीका केली, त्यावर व्यंगचित्रही लावले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुरुवारी पलटवार केला. माजी आमदार अनिल राठोड, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, ज्येष्ठ नेते अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर आदींनी खासदार गांधी व त्यांचे चिरंजीव नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यावर शरसंधान साधले. 

'छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या छिंदमचा राजीनामा घेतला की नाही, त्यावरील सही नेमकी कोणाची आहे व त्याने पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जाबाबत खासदार गांधी यांनी तातडीने खुलासा करावा', अशी मागणी शिवसेनेने या वेळी केली. 

छिंदमच्या राजीनाम्यावर ते तोंड उघडत नाहीत, नेहरू मार्केटची जागा लाटण्याचा त्यांचा डाव हाणून पाडल्याने ते प्रोफेसर कॉलनी गाळ्यांबाबत बोलत आहेत, पण येथील गाळ्यांसाठीची महापालिकेची निविदा प्रक्रिया राज्यातील भाजपच्याच सरकारने मंजूर केली आहे, त्यामुळे त्याविरोधात आता खासदार गांधी व त्यांच्या चिरंजीवांनी मुख्यमंत्र्य़ांविरोधात आंदोलन करावे', अशा शब्दात या वेळी सेनेकडून टीका केली गेली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.