झेपत नसेल तर भाजप सरकारने सरळ पायउतार व्हावे - राज ठाकरे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सरकारला शांतता आणि सुव्यवस्था सांभाळता येत नाही हे स्पष्ट दिसते आहे. त्यांची बेजबाबदार विधाने याची साक्ष आहेत. पुन्हा एकदा आश्वासने देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचा यांचा प्रयत्न आहे किंवा न्यायालयाचे कारण देऊन यांना प्रश्न तसाच ठेवायचा आहे. प्रत्येक गोष्ट न्यायालयातच न्यायची असेल तर सरकारचे कामच काय? झेपत नसेल तर सरकारने सरळ पायउतार व्हावे. जनतेच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
Loading...

आरक्षण दिल्यावर खरेच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहेत? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? सरकारचे धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचे आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरच भविष्यात रोजगार असणार आहे का? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय? त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय? या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात. नाहीतर आमची मुले उगाच आशा लावून बसायची आणि हकनाक बळी जायची, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. 


आपल्याला 'मराठी' म्हणून ते परवडणारे नाही मराठा मूक-क्रांती मोर्चाचे ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केले होते. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असेही म्हटले होते. मात्र काकासाहेब शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव समर्पित केला आणि घडू नये ते घडले. अर्थात असे असले तरी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की यापुढे एकाही 'मराठी', मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल, ब्राह्मण किंवा दलित असेल, कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.