संगमनेरच्या तहसीलदारांना वाळूतस्करांची धक्काबुक्की

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बेकायदा वाळूउपसा राेखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांना वाळूतस्करांनी धक्काबुक्की करण्याचा प्रकार अकलापूरमध्ये घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अन्य दोन ठिकाणी पथकाने कारवाई करत सुमारे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तहसीलदारांनी ताब्यात घेतलेला वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर चालक ट्रॅक्टरची चावी घेऊन पसार झाला. 


जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर जाग्या झालेल्या महसूल खात्याने विनापरवाना वाळू उत्खनन करणाऱ्यांच्या विरोधात संगमनेरमध्ये मोहीम उघडली. प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी वाळूउपसा रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सोमवारी खांडगाव आणि मांडवे येथे धडक कारवाई करण्यात आली. अकलापूरमध्ये तहसीलदारांनाच धक्काबुक्की केली गेली. 

Loading...
तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या तक्रारीवरून दोघा जणांविरोधात घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार तालुका पोलिसांसमवेत आपल्या खासगी वाहनातून अकलापूर शिवारातील देवकर वस्तीवर आले होते. तेथे त्यांना विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना आढळून आला. संबंधित ट्रॅक्टर अशोक वाघ यांच्या मालकीचा असून त्यातून विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. 

हा ट्रॅक्टर पोलिस ठाण्याकडे आणत असताना रस्त्यात अशोक वाघ याचा चुलत भाऊ संदेश वाघ याने अडवत तहसीलदार आणि त्यांच्या सोबतच्या पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत तेथून पळ काढला. तहसीलदार आणि त्यांच्यासोबतच्या पोलिस कर्मचाऱ्याने पकडलेला ट्रॅक्टर घारगाव पोलिस ठाण्यात आणला.

पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर लावून अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टरचालक चावी घेऊन पसार झाला. यासंदर्भात तहसीलदारांच्या तक्रारीवरून अशोक वाघ आणि संदेश वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर मांडवे आणि खांडगाव येथील कारवाईत महसूलच्या पथकाने दोन ट्रॅक्टर आणि दोन टेम्पो पकडले आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.