मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्ह्यात ११ ठिकाणी आज रास्ता रोको आंदोलन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी दुपारी १२ वाजता नगरमधून जाणाऱ्या मार्गांवर ११ ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता शिवपुतळ्यास अभिवादन करून दुचाकी रॅली काढत बंदचे आवाहन करण्यात येणार आहे. शाळा बंद ठेवाव्यात, अशी विनंती मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकांना केली आहे. 


जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या तरूणाला मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे श्रध्दांजली वाहण्यात आली. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कायगाव टोका येथे आंदोलन सुरू असताना काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीत उडी मारून जीव दिला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. 


Loading...

नगर शहरात मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. क्रांती मोर्चाच्या कार्यकत्यांनी मंगळवारी सकाळी हुतात्मा स्मारक येथे काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहिली. बुधवारी करण्यात येणाऱ्या अांदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सायंकाळी ७ वाजता ओम गार्डन येथे सकल मराठा समाजाची बैठक झाली. त्यात बुधवारी शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली. 

त्याचबरोबर शहरातून जाणाऱ्या वेगवेगळ्या महामार्गांवरील ११ ठिकाणी दुपारी १२ वाजता रास्ता रोको करण्याचाही निर्णय घेण्यात आला. प्रत्येक ठिकाणच्या आंदोलनासाठी समिती नेमण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन मंगळवारी व बुधवारी शाळा बंद ठेवण्याची विनंती केली आहे. 

मंगळवारी दुपारी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली होती. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात चौकाचौकांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हुतात्मा स्मारक येथेही मोठा बंदोबस्त होता. दिवसभरात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.