शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या विरोधात उपोषण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या बाबतीत विविध मागण्यांसाठी शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून उपतालुकाप्रमुख प्रकाश शेटे यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी मंदिर परिसरात उपोषण सुरू केले आहे. काल तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच होते. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

Loading...
याबाबत शेटे यांनी सांगितले, की शनिशिंगणापूर देवस्थान शासनाने ताब्यात घेतल्याची घोषणा केल्यानंतर अत्यंत घाईने प्रशासन व विश्वस्त मंडळाने दप्तरात फेरबदल करत कर्मचारी भरती व पगारवाढ केली आहे. हे अत्यंत घाईने करण्यात आले आहे. यासंदर्भात काही विश्वस्तांनी संस्थानकडे माहिती मागितली; मात्र ती देण्यात आली नाही. यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. 

त्यामुळे देवस्थान ट्रस्टच्या कारभाराविषयी शंका उपस्थित केली जात आहे. याविषयी विश्वस्तांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात आपण न्यायालयात जाणार असल्याचेही शेटे यांनी सांगितले. उपोषणात शेटे यांच्यासह सरपंच बाळासाहेब बानकर, डॉ. वैभव शेटे, सयाजी शेटे, दत्ता शेटे, ऋषीकेश शेटे, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शुभम बंब, विश्वस्त सोमनाथ शेटे, बाळासाहेब कुऱ्हाट, नवनाथ शेटे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपोषणात बसले आहेत. 

काल प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार तसेच पोलीस उपनिरीनिरीक्षक श्रीमती राऊत यांनी आंदोलनकत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सायंकाळी पाचपर्यंत आंदोलनकर्त्यांना माहिती द्यावी, अशी सूचना त्यांनी देवस्थान प्रशासनाला केली होती. मात्र सायंकाळनंतरही माहिती मिळाली नव्हती. यावर उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.