प्राथमिक शिक्षक बँकेशी संबंध नाही - अण्णा हजारे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेले काही दिवस वर्तमानपत्रातून प्राथमिक शिक्षक बँके संबंधाने उलटसुलट बातम्या वाचायला मिळतात. या बातम्यांमध्ये माझ्या नावाचा व फोटोचा संबंध जोडला जात असल्याचे दिसते. वास्तविक मला सुरूवातीपासूनच कोणत्याही ठिकाणी माझे नाव किंवा फोटो वापरलेला आवडत नाही. कार्यकर्त्यांनाही मी नेहमी सांगत असतो की सेवाभावाने कार्य करीत असताना कॅमेऱ्यापासून नेहमी दूर राहिले पाहिजे. 


कार्यकर्ता कॅमऱ्यामध्ये अडकला की बाहेर पडणे अवघड होते. मी कॅमेऱ्यासमोर न गेल्यामुळे आज सेवाभावाने काही करू शकलो. त्यामुळे मी कॅमेऱ्यासमोर जात नसलो तरी कॅमेरे माझ्या मागे फिरताना दिसतात. म्हणून मी कोणालाही माझा फोटो वापरण्यास परवानगी देत नाही. अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षक बँकेच्या आरोप प्रत्यारोपात वारंवार माझ्या नावाचा किंवा फोटोचा संबंध जोडणे योग्य नाही.

Loading...

वास्तविक पाहता समाजात गुरूजींची प्रतिमा ही आदरयुक्त आहे. ती जपण्याचा गुरूजनांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु गुरूजनांमध्ये राजकारण, आरोप प्रत्यारोप आणि त्यातून सुरू असलेली भांडणे ही दुर्दैवी आहेत. त्याचा विद्यार्थ्यांवर, शिक्षणावर व समाजावर विपरीत परिणाम होतो याचे गुरूजनांनी विचार करणे गरजेचे आहे.

प्राथमिक शिक्षक बँकेच्या संबंधाने जे राजकारण व आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याच्याशी माझा काडीमात्र ही संबंध नाही. दोन्ही बाजूचे लोक येऊन मला भेटतात. आपआपली बाजू मांडतात. परंतु प्रत्यक्षात बँकेशी माझा कोणताही संबंध नाही. असे असताना पुन्हा पुन्हा माझे नाव जोडणे, वर्तमानपत्रातून माझ्या नावाने चुकीच्या व उलट सुलट बातम्या देणे योग्य नाही. 

त्यामुळे गुरूजींच्या आदरयुक्त नावापर शिंतोडे उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. घटनेने प्रत्येकाला राजकारण करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे ज्यांना राजकारण करायचे त्यांनी करावे परंतु त्यात माझे नाव कुठेही वापरू नये. असेही अण्णा हजारे यांनी या पत्रात सांगितले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.