आमदार बाळासाहेब थोरातांचा मंगळवारी नागरी सत्कार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्‍याचे सुपुत्र व महाराष्ट्राचे नेते माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल तालुक्‍यातील तमाम जनतेच्या वतीने मंगळवारी (24 जुलै) सकाळी दहा वाजता मालपाणी लॉन्स येथे भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार डॉ.सुधीर तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, विश्‍वास मुर्तडक यांनी दिली आहे.

थोरात यांनी राज्यमंत्री मंडळात महसूल, कृषी, शिक्षण, रोहयो, पाटबंधारे अशी महत्वाची खाती सांभाळून एक विश्‍वासदर्शक काम केले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा जपत त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते म्हणून उभ्या महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला आहे. 

त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत कॉंग्रेसने त्यांच्याकडे गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्याच्या जबाबदाऱ्या दिल्या. त्यांनी सक्षमपणे सांभाळल्या. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अतिशय महत्वाच्या व प्रतिष्ठेच्या कार्यकारिणीवर कायमस्वरुपी निमंत्रित सदस्य म्हणून त्यांची निवड केली आहे. 

आमदार थोरात हे मंगळवारी संगमनेरच्या दौऱ्यावर येत असून तालुक्‍यातील नागरिक, युवक, महिला, कॉंग्रेस पक्षाचे सर्व विभाग व अमृत उद्योग समूह, विविध सेवाभावी संस्थांच्यावतीने भव्य दिव्य सत्कार समारंभ होणार आहे.
Loading...

या कार्यक्रमासाठी राज्यातील कॉंग्रेसचे पदाधिकारी व अनेक जिल्ह्यांतून कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भव्य दिव्य सत्कारसोहळयासाठी तालुक्‍यातील युवकांनी स्वागताची जंगी तयारी सुरू केली आहे. या सत्कार सोहळयासाठी तालुका व शहरातील सर्व नागरिक, बंधू भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सत्कार सोहळा समिती, कॉंग्रेसपक्षाचे विविध सेल व अमृत उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.