पारनेरमध्ये नवरी दाखवली एक अन्‌ उभी केली दुसरी, वर पक्षाकडून महिला एजंटाची मंडपातच धुलाई !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लग्नासाठी वराला एक वधू दाखवण्यात आली. ती वराला पसंतही झाली. ही सोयरीक जुळवून देणाऱ्या महिलेला 50 हजाराचे बक्षिसही देण्यात आले. लग्नही ठरले. परंतु लग्नासाठी उभी केलेली नवरी दुसरीच निघाल्याने हे लग्न जमवणाऱ्या महिलेची भर लग्न मंडपातच नवरदेवाच्या नातेवाईकांकडून धुलाई करण्यात आली. तालुक्‍यातील जवळा येथील भवानी मातेच्या आवारात हा प्रकार घडला.
Loading...

याबाबतची माहिती अशी, पारनेर तालुक्‍यातील वडगाव गुंड येथील एका तरुणाला लग्नासाठी सोलापूर जिल्ह्यातील एक वधू दाखवण्यात आली. यासाठी मुलगी दाखवणाऱ्या महिलेने 50 हजार कमिशन घेतले. वराला मुलगी पसंत झाल्यानंतर काही दिवसांनी त्याच मुलीबरोबर टिळा करण्यात आला.

त्यांचा विवाह शनिवारी (दि. 21 रोजी) जवळा येथील भवानी माता मंदिरात पारही पडणार होता. वर पक्षाकडून या विवाहाची जोरदार तयारीही करण्यात आली. परंतु ही सोयरीक जमवण्याचे काम करणाऱ्या महिलेने ऐन लग्नघटीका जवळ येताच दुसरीच वधू लग्नाला उभी केली. हे वर पक्षाच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी या महिलेला जाब विचारला. यावर ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. तिने दुसऱ्याच दोन मुलींपैकी एकीबरोबर लग्न लावण्याचे सुचवले.

या प्रकाराने वराच्या संतापलेल्या नातेवाईकांनी भर मंडपातच या महिलेची धुलाई केली. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच ते घटनास्थळी धावले. त्यांनी या महिलेला ताब्यात घेतले. या विवाहाची जोरदार चर्चा पारनेर तालुक्‍यात शनिवारी दिवसभर सुरु होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.