कर्जत-जामखेड तालुक्यातील शंभर शाळांना एलसीडी प्रोजेक्टरचे लोकार्पण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नॅशनल इन्शुरन्स कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून कर्जत-जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शंभर शाळांना दिलेल्या एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण घेता येईल. भविष्यातील पिढी तयार करताना अशा पद्धतीचे शिक्षण आवश्य़क असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. 

दरम्यान, कर्जत-जामखेड या मतदारसंघातील प्रत्येक गावांना शुद्ध व फील्टर स्वरुपात पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आर.ओ. यंत्रणा विविध उद्योग समुहांच्या मदतीने सीएसआरच्या माध्यमातून बसविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पंचायत समिती कर्जत-जामखेड व नॅशनल इन्‍शुरन्‍स कपंनी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने प्रगत शैक्षणिक महाराष्‍ट्र कार्यक्रमांतर्गत कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातील जिल्‍हा परिषदेच्‍या 100 शाळांना इन्‍शुरन्‍स कंपनीच्‍या सी एस आर फंडातून एल. सी. डी प्रोजेक्‍टरचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते पार पडला.कर्जत तालुक्यातील 54 आणि जामखेड तालुक्यातील 46 शाळांना 70 लाख रुपयांच्या या एलसीडी प्रोजेक्टरचे वितरण संबंधित शाळांना प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले. 

अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, जिल्‍हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) रमाकांत काठमोरे, नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या क्षेत्रीय प्रबंधक, आर के एल्‍लाबादी, वरिष्‍ठ मंडळ प्रबंधक प्रमिला जाधव, कर्जत पंचायत समिती सभापती पुष्पाताई शेळके, जामखेड पं.स. सभापती सुभाष आव्हाड आदींची उपस्थिती होती.
Loading...


यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, खऱ्या अर्थाने आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षण घेता येणार आहे. भविष्यातील पिढी तयार करताना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही यात प्रगत असावा, ही यामागची भूमिका आहे. नॅशनल इन्शुरन्सच्या कंपनीच्या माध्यमातून या शाळांचे हे स्वप्नं पूर्ण होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागातील अनेक शाळा आता आयएसओ दर्जा प्राप्त करीत आहेत. शैक्षणिक प्रगती करण्यासाठी आता शहरी ग्रामीण असा भेद तंत्रज्ञानामुळे कमी होत आहे. अशावेळी हे तंत्रज्ञान आणि त्यामार्फत शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आता अशा एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून होणार असल्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले.

ज्याप्रमाणे ग्रामीण भागात शैक्षणिक विकास गरजेचा आहे, त्याचप्रमाणे पिण्यासाठी शुद्ध पाणी गरजेचे आहे. त्यामुळेच विविध औद्योगिक आस्थापनांना त्यांचा सीएसआर निधी अशा आर.ओ. यंत्रणा उभारण्यासाठी द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. लवकरच कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सर्व गावांना अशी शुद्ध पाण्याची यंत्रणा उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असे तंत्रज्ञान उपलब्ध होणे हे त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या श्रीमती एल्लाबादी यांनी कंपनी सीएसआर निधीच्या माध्यमातून नेहमीच समाजोपयोगी कामांना मदत करीत असल्याचे सांगितले. कर्जत पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत बुद्धिवंत आणि जामखेड पंचायत समिती सभापती श्री. आव्हाड यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. काठमोरे यांनी केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.