भंडारदरा पाणलोटात पुन्हा जोरदार पाऊस.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दोन दिवस विसावलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला असून आषाढ सरींच्या तांडव नृत्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाण्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत होती; पंरतु बुधवारी दुपारपासून पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने पाणीसाठ्यात होणारी वाढ मंदावली होती; पंरतु शुक्रवारी सकाळपासूनच आषाढ सरींचे तांडव सुरु झाले आहे. 


Loading...

त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. भंडारदरा धरण कधी भरते याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. धरणाचा पाणीसाठा ९१०० दलघफू झाल्यानंतर सांडव्याद्वारे किंवा अंब्रेला फॉलमधून धरणाचा पाणीसाठा कायम ठेऊन पाणी प्रवरा पात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण शाखाधिकारी राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे. 

अशी परिस्थिती ३१ जुलैपर्यंत ठेवणार असून तद्नंतर केंव्हाही धरणसाठा १०,५०० दलघफू झाल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर करण्यात येणार आहे.. गत चोवीस तासात भंडारदरा येथे २३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून घाटघर २९ मि.मी., पांजरे २८ मि.मी., रतनवाडी १४ मि.मी. पाऊस पडला असून भंडारदरा धरणाचा पाणीसाठा काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ८९९५ दलघफू झाला होता. वाकी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून कृष्णावंती नदीमध्ये ५५६ क्युसेक्सने पाणी वाहत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.