प्रियकराच्या मदतीने डोक्यात दगड घालून पतीचा खून,नेवासा तालुक्यातील आरोपीस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चिकलठाण (ता. कन्नड) शिवारात ३२ वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून आणि गुप्तांग ठेचून खून करण्यात आल्याची घटना २२ मे रोजी घडली होती. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे तब्बल सव्वा महिन्याने समोर आले. विजय शिवलाल राठोड (रा. घुसूर तांडा, ता. कन्नड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

त्याची पत्नी रंजनाबाई विजय राठोड (२८) हिच्या सांगण्यावरून प्रियकर ज्ञानदेव नामदेव तुपे (३८, रा. बऱ्हाणपूर, ता. नेवासा जि. अहमदनगर) याने खून केल्याचे पोलीस तपासात निषन्न झाले. या दोघांना औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखा आणि कन्नड पोलिसांच्या पथकाने अटक केली.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चिकलठाण शिवारातील शेतात घुसूर तांडा येथील विजय शिवलाल राठोड याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर तसेच गुप्तांगावर दगडाने घाव घालण्यात आल्याचे निदर्शनास आले. 

Loading...

घटनेची माहिती पोलीस पाटील अरविंद धनेधर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्याने तात्काळ उपनिरीक्षक रोहित बेंबरे, बीट जमादार स्वरूपचंद चव्हाण, सहायक फौजदार जी. एन. किरमाने, कुंवरसिंह ठाकूर, एस. पी. भांबरे, पोलीस मित्र संतोष ढोले घटनास्थळी दाखल झाले. 


पंचनामा करून मृतदेह चिकलठाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी आणून नंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी गोवर्धन नारायण जाधव यांच्या फिर्यादीवरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन तपास सुरू केला होता. गुप्त माहिती आधारे मयताची पत्नी रंजनाबाई विजय राठोड हिचा प्रियकर ज्ञानदेव नामदेव तुपे याने खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुन्हा घडल्यापासून आरोपी हा फरार झाला होता. 


अखेर तो त्याचे गाव घोडेगाव येथे असल्याची पक्की माहिती मिळताच मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला कन्नड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीने खुनाची कबुली दिली. तो कन्नड तालुक्यातील आंबा तांडा येथे तीन वर्षांपूर्वी ट्रॅक्टरवर कामाला आला असता मयताची पत्नी रंजनाबाईशी त्याचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. 


विजय हा दारू पिऊन रंजनास मारहाण करत असल्याने व अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. २२ मे रोजी रंजनाने विजय यास कन्नड बसस्थानकावर फोन करून बोलावून घेतले व आरोपीच्या मोटारसायकलवर बसून दिले. 


त्यानंतर आरोपीने विजयला चिकलठाण शिवारात आणले. तो दारू पिलेला असल्याचा फायदा घेत त्याच्या डोक्यात व गुप्तांगावर दगडाने ठेचून हत्या केली. हा प्रकार रंजनास सांगून ज्ञानदेव गावाकडे निघून गेला होता. 


गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक एस. बी. कापुरे, पोलीस कर्मचारी बालू पाथ्रीकर, शेख नदीम, बाबासाहेब नवले, योगेश तरमले, जीवन घोलप, रमेश सोनुने यांनी केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.