पारनेरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांकडून अत्याचार..


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीस डांबून ठेवून तिच्यावर तब्बल महिनाभर दोघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दोघाही नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. 

रोशन सुरेश पवार (वय २०, रा. वडगाव आमली, ता. पारनेर) व सचिन विठ्ठल रोहोकले (वय २५, रा. माळवाडी, भाळवणी ता. पारनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी- दि. २७ मे रोजी पीडित मुलगी गावातीलच तिच्या आजोबांसोबत मळ्यात जनावरे सांभाळत असताना दुपारी ४.३० वाजता तिच्या मोबाईलवर रोशन सुरेश पवार याने फोन करून मला तुला भेटायचे आहे, असे सांगून तिला शेताजवळील गावापासून थोड्याच अंतरावर असलेल्या अमोल सुदाम पवार यांच्या बंद घराजवळ बोलावले. 

पीडित मुलगी आजोबांना काहीही न सांगता रोशनने सांगितल्याप्रमाणे त्या बंद घराजवळ गेली. तेथे रोशन यास भेटल्यावर तू आता कोठेही जायचे नाही, असे सांगून पीडितेस त्याने बंद घरात नेले. तेथे पीडितेकडील मोबाईल ताब्यात घेऊन आरडा ओरडा केल्यास किंवा पळ काढण्याचा प्रयत्न केल्यास ठार मारील, अशी धमकी दिली. व पीडितेस घरात कोंडून बाहेरून कुलूप लावून रोशन तेथून निघून गेला. 

Loading...
त्या रात्री तो परत आला नाही. त्यानंतर दररोज रात्री १० नंतर तो पीडितेस खाण्यासाठी वडापाव, समोसे, पिण्याचे पाणी घेऊन येत असे व तेथेच मुक्काम करीत असे. मुक्कामादरम्यान रोशन पीडितेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करीत असे. काही दिवसानंतर रोशन याने सचिनला पीडितेकडे नेले. 

त्याने सचिनची मावसभाऊ म्हणून ओळख करून दिली. त्यांनी सोबत आणलेले अन्नपदार्थ पीडितेने खाल्ल्यानंतर ते तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी एकटा सचिन रोहोकले वडापाव, समोसे तसेच पाण्याच्या बाटल्या घेऊन आला. रोशन का आला नाही, अशी विचारणा करून पीडितेने त्यास फोन लावून देण्यास सांगितले. 

रोशनशी संपर्क केल्यानंतर तुझ्या घरचे माझ्या घरी येऊन गेल्यामुळे माझ्या घरचे लोक मला बाहेर येऊ देत नाहीत, अशी बतावणी रोशनने केली. त्यानंतर दोघेही आलटून पालटून बंद खोलीत येत व खाद्यपदार्थ देऊन निघून जात. १५ - २० दिवसांत रोशन पवार याने पीडितेवर चार वेळा अत्याचार केला. 

बहिणीचे लग्न असल्याने यापुढे मावसभाऊ सचिन जेवण व पाणी घेऊन येईल, असे पीडितेस रोशनने सांगितले. पुढील आठ ते नऊ दिवस सचिन रोहोकले जेवण व पाणी घेऊन जात होता. दोघांच्या भेटीदरम्यान सचिन रोहोकले यानेही पीडितेवर तीनवेळा अत्याचार केला.

दि. २५ जून रोजी रात्री ९.३० वाजता सचिन खाद्यपदार्थ घेऊन गेला. ते खाल्ल्यानंतर रोशन कधी येणार आहे, मला इथे रहायचे नाही, असे पीडितेने सांगितल्यावर यापुढे रोशन येथे येणार नाही, त्याचा नाद सोडून दे, मी तुला तुझ्या घराजवळ सोडतो, असे सचिन म्हणाला. 

त्यानंतर सचिनने पुन्हा पीडितेवर अत्याचार करून जे घडले ते कोणासही सांगू नकोस, नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. दि. २६ जून रोजी रात्री १२.३० च्या सुमारास सचिनने पीडितेस तिच्या आजोबांच्या घराजवळ नेऊन सोडले व तेथून दुचाकीवर निघून गेला. 

दार वाजवूनही आजोबांनी ते न उघडल्याने पीडित मुलगी घराबाहेरील ओट्यावर बसून राहिली. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास आजोबा लघुशंकेसाठी घराबाहेर आले असता, पीडिता त्यांच्याजवळ धावून गेली. आजोबांनी तिला इतके दिवस कोठे होती, याची विचारणा केली असता, तिने काहीच उत्तर दिले नाही. 

आजोबांच्या घरी झोपल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता तिचे आई -वडील आजोबांच्या घरी आले. तेव्हा पीडितेने झालेला प्रकार सर्वांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आई -वडिलांनी तिला पारनेर पोलीस ठाण्यात नेले. तिने दिलेल्या जबाबानुसार दोघा नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पीडितेचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात यापूर्वीच दाखल केली होती.

गॅंगरेप, पोक्सो व ॲट्रॉसिटीचे गुन्हे.

अज्ञात व्यक्तीने अपहरण करून डांबून ठेवणे, अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध सामूहिक अत्याचार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच इतर कलमान्वये दोघा आरोपींविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रेमाची व लग्नाची भुरळ!

पीडित मुलगी व आरोपी रोशन पवार यांची ७ ते ८ वर्षांपासून ओळख होती. सतत भेटून, गोड बोलून रोशनने तिला सीम कार्डसह एक मोबाईल दिला होता. दोघे एकमेकांशी फोनवर बोलत असत. माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण लग्न करू, असे आमिषही तो नेहमी दाखवित असे. पीडितेचा विश्वास संपादन केल्यावर याचा गैरफायदा घेऊन रोशनने तिला डांबून ठेवले. रोशन व त्याच्या मावस भावाने तिच्यावर महिनाभर अत्याचार केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.