श्रीरामपुरात लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा - आदिक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा लवकरच शिवाजी चौकात बसवण्यात येईल. अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा सर्वांशी एकत्र बसून चर्चा करून संपुष्टात येईल. या प्रश्नी आपण पाठपुरावा करत असून शहरात पूर्णाकृती पुतळा उभा रहावा, अशी माझीसुद्धा इच्छा आहे, असे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी मराठा बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात आदिक यांना निवेदन देण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास जाधव म्हणाले, पुतळा बसवण्याबाबत वारंवार मागणी करूनही अद्याप तो बसवण्यात आलेला नाही. श्रीरामपूर वगळता राज्यातील सर्व तालुक्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे आहेत. एवढेच नव्हे, तर परदेशांत व आपल्या सीमेवरही अनेक ठिकाणी लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले आहेत. Loading...
या महापुरुषाचा पुतळा लवकर बसवण्यासाठी एक तारीख निश्चित करावी, जेणेकरून शहरवासीयांच्या आनंदात भर पडेल. भागवत लासुरे यांनी प्रास्ताविक केले. नगरपालिका अनेक महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करते. त्याप्रमाणे राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शहाजी राजे यांच्या जयंती व पुण्यतिथी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिन साजरा करावा, अशी मागणी त्यांनी केली. 

शिवाजी महाराज पुतळ्याप्रश्नी आम्ही सकारात्मक असून हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, असे नगरसेवक राजेंद्र पवार म्हणाले. या वेळी राजेंद्र मोरगे, राजेंद्र पठाडे, जयंत चौधरी, डॉ. प्रशांत चव्हाण, रावसाहेब तोडमल, लक्ष्मीकांत शिंदे, गणेश जाधव, प्रवीण आहेर, ऋषिकेश मोरगे, संदीप चोरगे, संदीप ठोकळ, अनिल नवले आदी उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.