माजी उपनगराध्यक्षांच्या घरातून पाच लाखांचा मुद्देमाल लांबविला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी शहरातील मध्यवर्ती भागात राहणाऱ्या माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर यांच्या अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून गुरूवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातून सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने तसेच अडीच लाख रुपयांची रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रूपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. 

सायंकाळी सातच्या सुमारास भर वर्दळीच्या ठिकाणी घटना घडल्याने एकच खळबळ शहरात माजली आहे.. दरम्यान, घटनास्थळी शिर्डी पोलिसांनी भेट दिली. शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ भाऊसाहेब गोंदकर हे शिर्डीतील मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजीनगर येथील रिंगरोड शेजारी आपल्या कुटुंबियांसमवेत राहण्यास असून गुरूवारी सायंकाळी पावणेसहा वाजता कुटुंबातील मंडळी नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. 

Loading...
दरम्यान, सव्वासात वाजता घरी परतल्यावर घराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळून आले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. यावेळी घरातील महिलांनी तातडीने गोंदकर यांना संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. गोपीनाथ गोंदकर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. तातडीने शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने, उपनिरीक्षक संदिप कहाळे, पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. 

श्वान पथकास सकाळी पाचारण करण्यात येणार असल्याचे समजले. यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी गोंदकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.