कोळपेवाडी ग्रामपंचायतमधील काळे गटाच्या सहा सदस्यांचे सदस्यत्त्व रद्द.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्‍यातील कोळपेवाडी ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी अतिक्रमण करून त्यावर बांधकाम केल्याच्या कारणावरून त्यांचे सदस्यत्त्व रद्द केले आहे. याबाबत आलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश दिले. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 अ 3 व 16 अन्वये वरील सहा जणांचे सदस्यत्व रद्द केल्याचे सांगण्यता आले. काळे परिवाराचा गड म्हणून ओळख असलेल्या कोळपेवाडी येथेच अशा प्रकारे कारवाई झाल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

याबाबतची माहिती अशी की, कोळपेवाडी येथील राजेंद्र निवृत्ती कोळपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत विवाद अर्ज 13 ते 16 व 21 आणि 22 हे 24 एप्रिल 2018 रोजी दाखल करून ग्रामपंचायत सदस्य महेश राजेंद्र कोळपे, सुभद्राबाई कचरू कोळपे, अलका पाटीलबा धायगुडे, प्रेमाबाई दयाळ पारचे, दीपाली कैलास कोळपे व शोभा उर्फ सुनीता बाबासाहेब थोरात यांच्या विरोधात अतिक्रमण केले म्हणून त्यांचे सदस्यत्त्व रद्द व्हावे म्हणून मागणी केली होती. 
Loading...

त्याप्रमाणे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ग्रामपंचायत सदस्यांना बाजू मांडण्यांची संधी दिली. याप्रकरणी तक्रारदार व ग्रामपंचायत सदस्यांचा युक्‍तिवाद जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ऐकूण घेतला. त्याप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी केली. तक्रारदार राजेंद्र निवृत्ती कोळपे यांनी विरोधी काळे गटाचे ग्रामपंचायत सदस्य महेश राजेंद्र कोळपे यांनी सरकारी गट नंबर 75 वर अतिक्रमण करून शौचालय बांधले.

सुभद्राबाई कचरू कोळपे यांनी सरकारी गट नंबर 280 वर अतिक्रमण करून घर बांधले, अलका पाटीलबा धायगुडे यांनी सरकारी गट नंबर 75 वर अतिक्रमण करून शौचालय बांधले, प्रेमाबाई दयाळ पारचे यांनी सरकारी गट नंबर 280 वर अतिक्रमण करून घर बांधले, शोभा थोरात यांनी सरकारी गट नंबर 280 वर गाळा बांधला, तर दीपाली कैलास कोळपे यांना 13 सप्टेंबर 2000 नंतर तिसरे अपत्य असूनही निवडणूक घोषणापत्रात त्याबाबतची नोंद न करता खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. 

तेव्हा अतिक्रमित जागेवर घर, गाळा, शौचायल तसेच खोटी अपत्य माहिती दिली म्हणून या सर्वांचे ग्रामपंचायत सदस्यत्त्व रद्द व्हावे म्हणून मागणी केली. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व युक्‍तिवाद ऐकूण घेत त्यावर 5 जुलै रोजी या सर्वांचे ग्रामपंचायत सदस्यत्त्व रद्द करण्याचा आदेश दिला. त्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.