'मराठा मूक मोर्चा'ला मोठे यश,महाभरतीत मराठा समाजास १६ टक्के आरक्षण!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  या वर्षी राज्य शासनाने विविध विभागांतील नोकऱ्यांकरिता महाभरती प्रस्तावित केली असून त्यात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मराठा समाजातील युवकांकरिता १६ टक्के आरक्षण राखीव ठेवून बॅकलॉग पूर्ण करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केली.


बीड जिल्ह्यात परळी येथे मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर पुकारलेल्या मोर्चाच्या अनुषंगाने वि. प. सदस्य विनायक मेटे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये उपस्थित केलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील चर्चेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करून मराठा समाजातील बेरोजगारांना दिलासा दिला आहे.

विद्यमान सरकारनेच मराठा समाजास आरक्षणाचा कायदा केला असून उच्च न्यायालयाने या कायद्यास स्थगिती दिली होती. म्हणून सरकारने हा विषय सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. मात्र, तिथेही स्थगिती मिळाल्यावर हे प्रकरण पुन्हा सरकारने उच्च न्यायालयाकडे नेले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने मागासवर्गीय आयोगाचे गठन करून त्यांच्याकडून आरक्षणासंदर्भातील अहवाल मागविला आहे.

आयोगातर्फे याबाबत अत्यंत तीव्र गतीने कार्यवाही सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जनसुनावणी घेतली जाणार आहे. त्यानुसारच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारतर्फे आरक्षणाचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली. 

Loading...
धनंजय मुंडे यांनी आरक्षण होईस्तोवर मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी होऊ घातलेल्या महाभरतीत आरक्षणाच्याच आराखड्यानुसार १६ टक्के जागा मराठा समाजातील युवकांसाठी आरक्षित करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले. 

महाभरतीत प्रथम ३६ हजार आणि नंतर ३६ हजार जागा भरल्या जाणार आहेत. या दोन्ही भरतीत ३६-३६च्या वर, अशा एकूण ७२ हजारांच्या वर होणाऱ्या भरतीमध्ये १६ टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित करून त्यांचा बॅकलॉग भरल्या जाईल, अशी घोषणा करीत मागण्या मान्य केल्या. 

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे आरक्षण वगळता वसतिगृह, शिक्षणातील सवलती आणि उत्पन्नाच्या मर्यादेत केलेल्या वाढीनंतर मराठा समाजाला मोठा दिलासा प्राप्त झाला असून 'मराठा मूक मोर्चा'ला मोठे यश मिळाले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.