विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू, माहेरच्या मंडळींनी सासरच्या अंगणातच केले अंत्यसंस्कार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील कांचन राकेश कडू (वय २३) या विवाहितेचा घरापासून जवळच असणाऱ्या विहिरीत मृतदेह आढळला. या घटनेनंतर विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी आक्रमक होत सासरच्या घरासमोरच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कांचन हिचा भाऊ किरण चांगदेव कदम (वय २४, रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी) याने लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले की, कांचन हिचे दि. २३ मे २०१७ रोजी श्रीरामपूर येथील लक्ष्मी मंगलकार्यालयात थाटामाटात लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस तीस सासरच्यांनी चांगले नांदवले. मात्र एक ते दीड महिन्यानंतर मानपानाच्या कारणावरून आमरसाच्या कार्यक्रमातून ते निघून गेले. 


Loading...
त्यावेळी त्यांनी कांचनला बरोबर नेले नाही. त्यानंतर आठ दिवसांनंतर मी तिला घेऊन सासरी सोडून आलो. त्यानंतर तिला सासरे, सासू, नवरा, दीर व नणंद यांच्याकडून या ना त्या कारणावरून सतत त्रास चालू झाला. तिला शिवीगाळ करण्यात आली. याबाबत कांचनने वेळोवेळी आम्हाला फोनवरून सांगितले. 

दिवाळीदरम्यान तिचा नवरा राकेश याने सोन्याची अंगठी व कपड्याची मागणी केली. अन्यथा कांचनला नांदायला नेणार नाही, अशी धमकी दिली. दि. १७ जुलै २०१८ रोजी तिने मला फोन केला. व मला खूप त्रास सुरू आहे. उद्या मला भेटायला ये, असे सांगितले. त्यानंतर दि. १८ रोजी तिने विहिरीत जीव दिल्याचे तिच्या सासऱ्यांनी सांगितले. 

यावरून कांचनचा नवरा राकेश रामदास कडू, सासू विजया रामदास कडू, सासरा रामदास परशुराम कडू, दीर विरेश रामदास कडू, भाया रविराज रामदास कडू, जाव ज्योती रविराज कडू यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम ४९८ (अ), ३०६, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

परिस्थिती तणावपूर्ण असल्याने मृत कांचनचे नातेवाईक यांना पोलिसांनी तसेच शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, गणेश मुदगुले, प्रशांत शिंदे, सोमनाथ हापसे, ज्ञानेश्वर टेकाळे, सचिन ठुबे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. 

अखेरीस अत्यंत तणावपूर्ण वातावरणात मृत कांचनवर सासरच्या दारातच अंत्यसंस्क ार करण्यात आले. यावेळी शिर्डीचे पोलिस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे, लोणी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. रणजीत गलांडे, राहुरी पोलिस स्टेशनचे पो.नि. संजय शिळीमकर यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.