नगर जिल्ह्यातील 24 लाख लीटर दूध संकलन ठप्प,सुमारे पाच कोटींचे नुकसान.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दूध दरवाढ व्हावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली होती. दूध दरवाढीच्या मागणीच्या आंदोलनात पहिल्या दिवशी जिल्हातील 24 लाख लीटर दूध संकलन पूर्णपणे ठप्प झाले. जिल्ह्यात असणाऱ्या 165 दूध संकलन केंद्राच्या खात्यात एकही लीटर दूध जमा झाले नसून, कायदा, सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे.
Loading...

खासदार राजू शेट्टीने हाक दिल्याने पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील दूध संकलन ठप्प झाल्याने पाच कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. याच मुद्दयावर जर मागण्या मान्य न झाल्यास मुंबईसह इतर महानगरातलाही दूध पुरवठा रोखला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेच्या निर्णयानुसार राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील दूध संकलन पूर्णतः ठप्प झाले होते.

कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेचा सहभाग

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध दरवाढीच्या मागणीसाठी नगर जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षानेही पाठिंबा देऊन निदर्शने केली. दूध दरवाढीची मागणी असून, याबाबत राज्य सरकारने निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, असे कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

जिल्हाबाहेरील टॅंकर्स पोलीस बंदोबस्तात रवाना

कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत जिल्हा प्रशासन सतर्क असून, दूध टॅंकर रवाना करण्यासाठी कोणी मागणी केल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल, दूध घेऊन जाणाऱ्या जिल्ह्याबाहेरील काही टॅंकर्सना पोलीस संरक्षणात रवाना करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात प्रतिदिन 24 लाख लीटर दूध संकलन

जिल्ह्यात एकूण 165 दूध संघ आहेत. यात खासगी दूध संघांची संख्या 145 सहकारी दूध संघांची संख्या 12 तर दहा दूध संघ बहुराज्यीय अर्थात मल्टीस्टेट आहे. या सर्व दूध संघांमध्ये प्रतिदिन सुमारे 24 लाख लीटर दूध संकलन होते. परंतु, जिल्ह्यात असणाऱ्या दूध संकलनाच्या खाती एकही लीटर दूध संकलन झालेले नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.