सरपंचांच्या पतीला २६ लाखांचा दंड


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खिर्डीगणेश ग्रामपंचायतीच्या सरपंच सरला चांदर यांचे पती सोपान दगुजी चांदर व ग्रामसेवक यांनी बेकायदा, विनापरवाना ६७५ ब्रास वाळुमिश्रीत मुरूमाचा उपसा केल्याबद्दल परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा कोपरगावचे तत्कालीन तहसिलदार प्रशांत खेडेकर यांनी १८ लाख ३७ हजार ५०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. 

त्यावर फेरचौकशीत ५२५ ब्रास वाळुमिश्रीत मुरूमाऐवजी ६७५ ब्रास वाळूमिश्रीत बेकायदा मुरूमाचा उपसा केला म्हणून २६ लाख ३२ हजार ५०० रु. सदरचा दंड मुदतीत न भरल्यास ही जमीन महसुलाची थकबाकी म्हणुन वसुली करण्यात येईल,असे आदेश २३ ऑगस्ट २०१६ रोजी दिले होते. Loading...
ते प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या सुनावणीपुढे ९ जुलै २०१८ रोजी कायम करण्यात आले असुन सरपंच सरला चांदर यांचे पती सोपान दगुजी चांदर यांनी दाखल केलेले आरटीएस अपिल १४४ सन २०१७ फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती अशी की, खिर्डीगणेश ग्रामपंचायतीच्या सरपंच सरला चांदर यांचे पती सोपान दगुजी चांदर यांनी गारदा नदीवरील गाविंद बाब बंधारा, सर्व्हे नंबर ११२, म्हसोबा रोहम बंधारा आदि ठिकाणाहुन अनधिकृतपणे ५२५ ब्रास मुरूमाची वाहतुक केली. 


त्यासंदर्भात खिर्डीगणेश ग्रामस्थांनी तक्रार दाखल केली. त्याचा रितसर पंचनामा करून २ जुलै २०१५ रोजी त्याचा अहवाल सादर करण्यात आला. १९ जुलै २०१६ रोजी त्यांना याबाबत दंडाची आकारणी का करण्यात येवु नये म्हणुन नोटीस बजावण्यात आली. २२ जुलै २०१६ रोजी त्यांनी याबाबत लेखी खुलासा मांडला. 


त्यात म्हटले होते की, २० जून २०१५ रोजी ग्रामपंचायत खिर्डीगणेश ग्रामसेवक यांनी तहसिलदारांकडे मुरूम उचलण्याची परवानगी मागितली होती. त्याप्रमाणे परवानगी गृहीत धरून यातील उचललेला मुरूम खिर्डीगणेश गावातील रस्त्यासाठी वापरला.


मात्र त्यांनी त्यातही बनाव केला व शासनास ५०० ब्रास मुरूम उचलण्याचे डायमंड कंन्स्ट्रक्शन कंपनी संगमनेर यांचे मौजे तळेगाव (ता. कोपरगाव) चलन दाखवुन शासनाची दिशाभुल केली आहे. सदरचा दंड चुकविण्यासाठीही त्यांनी २३ जुलै २०१४ चे खडी व कॉँक्रीट रस्त्याची लाईन शासकीय रॉयल्टी चलन दाखवुन शासनाची फसवणुक केली आहे. 


मुरूम उपसा आणि या रॉयल्टीचा काहीएक संबंध नाही. तेव्हा सरपंच सरला चांदर यांनी पदाचा दुरूपयोग केला आहे. व ग्रामसेवक खिर्डीगणेश यांनी खोटे रेकॉर्ड दाखविले. तेव्हा सरपंच चांदर यांचे पद रद्द करावे व ग्रामसेवकास कायदेशीर दंड ठोठावण्यात यावा असेही या आदेशात नमुद करण्यात आले होते. 


या फेरचौकशीत ५२५ ब्रास मुरूमाऐवजी ६७५ ब्रास बेकायदा मुरूम सोपान दगुजी चांदर यांनी उचलला आहे,हे सिध्द झाले आहे. व २ जुलै २०१५ रोजी झालेला पंचनामा खोटा तसेच राजकीय हस्तक्षेपाचा कुठलाही पुरावा सरपंच सरला यांचे पती सोपान चांदर दाखल करू शकले नाही. 


त्यामुळे त्यांना झालेला दंड हा रास्तच असल्याचे प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे यांनी ९ जुलै २०१८ रोजी आदेश काढुन परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तत्कालीन तहसिलदार प्रशांत खेडेकर यांनी दिलेला निर्णय कायम करून सोपान चांदर यांचे अपिल फेटाळले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.