घनशाम शेलार यांची माजी मंत्री पाचपुते यांच्यावर घणाघाती टीका.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील विकासकामांसाठी आत्तापर्यंत मोठा निधी आला.परंतु तरी देखील शहराचा विकास झाला नाही, याचे कारण म्हणजे श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी आलेल्या निधीतील मलिदा आधी काष्टीच्या पिराला जातो आणि मग श्रीगोंद्यातील फकिराला दिला जातो. त्यामुळे निधी मिळूनही श्रीगोंदा शहराचा विकास अद्यापपर्यंत झाला नाही. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे जिल्हा समनवयक घनशाम शेलार यांनी केली.

श्रीगोंदा शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे दि.११जुलै पर्यंत न बुजवल्यास दि.१२ जुलैला श्रीगोंदा नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीने दिला होता. मात्र श्रीगोंदा नगरपरिषदेने शहरातील रस्त्यांची दुरुस्ती न केल्यामुळे शेलार यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन केल. यावेळी शेलार बोलत होते.



Loading...
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर नगरपरिषदेने तात्पुरत्या स्वरूपात शहरातील खड्ड्यांवर माती मिश्रित मुरूम आणून टाकला. परंतु हे खड्डे डांबर आणि खडीच्या सहाय्याने बुजवले जावेत, तसेच श्रीगोंदा नगरपरिषदेकडे चार डास फवारणी यंत्रे आहेत. परंतु सद्या त्यातील एकच फवारणी यंत्र सुरू असल्यामुळे शहरात डासांची संख्या वाढली असून, लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

तसेच शहरातील सार्वजनिक सुलभ शौचालयांची अवस्था दयनीय आहे. त्याच्या स्वच्छतेकडे नगरपरिषद डोळेझाक करीत आहे. तसेच हभप बबनराव पाचपुते यांनी २०१४ साली श्रीगोंदा शहराला पिण्यासोबतच वापरायला देखील शुद्ध पाणी देऊ असे सांगितले होते.पण आजूनही शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पाचपुतेंनी शहरातील नागरिकांचे पाणी योजनेवरून एप्रिल फुल केल्याची टीका देखील शेलार यांनी यावेळी केली. 


श्रीगोंदा नगरपरिषदेने मागण्या मान्य केल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु येत्या आठ दिवसात या सर्व प्रश्नांवर उपाययोजना न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. यावेळी तालुकाप्रमुख संजय आनंदकर, भाऊसाहेब गोरे, सखाराम गांजुरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.