अंतर्वस्त्रातून सोन्याची तस्करी २ कोटींहून अधिक रकमेचे सोने जप्त, चौघांना अटक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतर्वस्त्रातून सोन्याची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हवाई गुप्तचर यंत्रणेने या प्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक केली आहे. तसेच अन्य दोन प्रकरणांत आणखी दोघा प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोन्याच्या तस्करीच्या या तीन प्रकरणांमध्ये दोन कोटींहून अधिक रुपयांचे सोने जप्त केले गेले आहे.

गेल्या काही वर्षांत गोल्ड, परदेशी चलन आणि अमली पदार्थांच्या हवाईमार्गे होणाऱ्या तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक संशयित प्रवाशाची हवाई गुप्तचर विभागाने कसून तपासणी सुरू केली आहे. मंगळवारी शारजा येथून दोन विदेशी महिला मुंबईत दाखल झाल्या होत्या. या दोघींची हालचाल संशयास्पद वाटत असल्यामुळे त्यांना हवाई गुप्तचर अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. 
Loading...

पुढील तपासात त्यांनी अंतर्वस्त्रात लपवलेले ३२ लाख रुपये किमतीचे १ किलो ३९९ ग्रॅम वजनाचे गोल्ड बार पोलिसांनी जप्त केले. नादा अहमद मोहम्मद ओमेर आणि मनाल ओमर अलहसन मेहमूद अशी या दोघींची नावे असून त्या सुदान देशाच्या नागरिक आहेत. तर दुसऱ्या घटनेत हाफीज अबदुरुब या प्रवाशाला या अधिकाऱ्यांनी अटक केली. ग्रीन चॅनलमधून बाहेर पडत असताना त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. 

या वेळी त्याच्याकडील १ कोटी ३७ लाख रुपयांचे सुमारे पाच किलो वजनाचे गोल्ड बार जप्त केले आहेत. त्याच्या चौकशीनंतर शेख इरफान याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या घटनेत दुबईहून मुंबईत आलेल्या स्पायजेट एअरवेजच्या एका सीटमधून लपवून आणलेले २६ लाख १७ हजार रुपयांचे ९३२ ग्रॅम वजनाचे आठ गोल्ड बार जप्त केले आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.