ऐतिहासीक भूईकोट किल्ल्याचे उजळणार रुप, जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केली पाहणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विविध ऐतिहासीक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या अहमदनगर येथील भूईकोट किल्ल्याला पुन्हा ते ऐतिहासिक रुप मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला आहे. आज त्यांनी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांसमवेत तसेच राज्य शासनाच्या विविध यंत्रणांसोबत या किल्ल्याची तब्बल अडीच तास पाहणी केली. भूईकोट किल्ला सुशोभिकऱणासाठी तातडीने कार्यवाही कऱण्यात येईल. भूईकोट किल्ला सुशोभीकरण आणि विकासासाठी बृहत आराखडा (मास्टर प्लॅन) बनवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी सायंकाळी 4 वाजता लेफ्टनंट कर्नल एस,के, बारु, कर्नल एस. वर्मा, कर्नल राजबीर सिंग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, इतिहास अभ्यासक भूषण देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाने, सहायक नियोजन अधिकारी श्री. दातीर यांच्यासह संपूर्ण किल्ला पाहिला. 


या किल्ल्याचे ऐतिहासीक महत्व अबाधित राखण्यासाठी येथे सर्वात प्रथम स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणाऱ आहे. बाहेरुन प्रत्येकाला या किल्ल्याचे भव्य रुप नजरेस पडावे, यासाठी तटबंदीच्या आसपास जी झाडेझुडुपे वाढली आहेत, ज्याने तटबंदीला धोका पोहोचू शकतो, ती काढून टाकण्यात येणार आहेत.


Loading...
अनेक महत्वाचे नेते येथे बंदिवासात होते, त्या लीडर्स ब्लॉकलाही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी भेट दिली. त्यानंतर येथील सर्व बुरुज, आतील बांधकाम, विविध ठिकाणची पाहणी त्यांनी केली. यावेळी इतिहास अभ्यासक श्री. देशमुख यांनी त्यांना या किल्ल्यासंदर्भातील विविध घटनांची माहिती दिली.

या ऐतिहासिक किल्ल्याचे जतन चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे, त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात या किल्ल्याचे बाह्यरुप सर्वांना चांगल्या प्रकारे दिसावे यासाठी चारही बाजूंनी किल्ल्याला वेढलेल्या झाडेझुडुपे काढण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्युतीकरणाच्या आकर्षक रोषणाईने रात्री किल्ला उजळवला जाणार आहे. या ऐतिहासीक किल्ल्याच्या जतनासाठी जसे राज्य शासन आणि सैन्यदलाचा विभाग प्रयत्नशील आहे, तसाच हा ठेवा जतन करण्याची जबाबदारी नागरिकांचीही असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण परिसर त्यांनी कुतुहलाने पाहिला आणि यासंदर्भातील ऐतिहासीक घटनांची माहिती श्री. देशमुख यांच्याकडून घेतली.तत्पूर्वी, श्री. द्विवेदी यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे याचसंदर्भात चर्चा केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.