स्वच्छ व पारदर्शी कारभाराचा आव आणणाऱ्या शिक्षक बँकेचे बिंग फुटले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्वच्छ व पारदर्शी कारभाराचा आव आणणाऱ्या शिक्षक बँकेचे अध्यक्ष व संचालकांचे बिंग अखेर फुटले आहे. शिक्षक बँकेला तब्बल तीन कोटी ५० लाख रुपये तोटा झाल्याचे रिझर्व बँकेने जाहिर केले आहे. परंतु बँकेला दीड कोटी रुपये नफा झाल्याचे सांगून संचालक मंडळाने जिल्हयातील सर्व सभासदांची फसवणूक केली आहे. सभासदांचा विश्वासघात करणाऱ्या व निवृतीला ११ महिने अवधी असलेले अध्यक्ष रावसाहेब रोहकले यांनी तातडीने पदावरून पायउतार व्हावे. 

अन्यथा त्यांच्या केबिनला टाळे ठोकण्यात येईल, असा ईशारा गुरूकुल मंडळाने दिला आहे.. शिक्षकनेते डॉ. संजय कळमकर, समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे, गुरुकुलचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे, उदयकुमार सोनवळे, अंबादास मंडालिक, संजय कडूस यांनी बँकेचे व्यवस्थापक देशमुख यांची भेट घेऊन रिझर्व बॅंकेने शिक्षक बँकेवर ठेवलेल्या दोषारोपपत्राची मागणी केली. परंतु ते पत्र गोपनीय ठेवण्याचे संचालक मंडळाने सांगितल्याने त्यांनी ते देण्यास असमर्थता दर्शवली. 

Loading...

शिक्षक बँकेचा तोटा रिझर्व बँकेने चव्हाटयावर आणला का? या प्रश्नावर देखील त्यांनी मौन पाळले. रिझर्व बँकेने सभासदांना लाभांश देण्यावर अटी लादल्या आहेत. शिवाय संचालक मंडळाने १० हजार रुपयांच्यावर कुठलाही खर्च करु नये असे निर्बंध घातले आहेत. संचालकांनी बाहेरुन स्वच्छतेचा आव आणून वारेमाप उधळपट्टी केल्याचा हा परिणाम आहे, असा आरोप गुरूकुलने केला आहे. 


बँकेवर निर्बंध असतानाही नेवाशा शाखेचे तब्बल २५ लाख रुपयाचे काम संचालकांनी आर्थिक फायद्यासाठी सुरू केले आहे. शिवाय निवृत्त होण्याआधी विकास मंडळाची इमारत बांधण्याचा आर्थिक हट्ट रोहकले यांनी धरला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी बँकेची पत व प्रतिष्ठा घालवणाररे रोहकले यांनी या निर्बंधाची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर ढकलली आहे. 


बॅंकेत समाजसेवक आण्णा हजारे यांची प्रतिमा लावून त्याआडून भ्रष्टाचार करणारे रोहकले यांनी आता जास्त बनवेगिरी न करता पदावरून पायउतार व्हावे, असा सूचक ईशारा शिक्षक नेते रा. या. औटी, नितीन काकडे, वृषाली कडलग, लक्षमण टिमकारे, गजानन जाधव, सीताराम सावंत, भास्कर नरसाळे, विजय महामुनी, सुखदेव मोहिते, शिवाजी रायकर यांनी दिला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.