श्रीगोंद्यात तरूणींना विवस्त्र करून मारहाण २० जखमी ८ गंभीर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जात पंचायतीने वाळीत टाकल्याची फिर्याद दिलेल्या श्रीगोंद्यातील एका कुटुंबावर बुधवारी रात्री हल्ला करण्यात आला.जातपंचायतीमधून बाहेर काढलेल्या प्रसंगाची व्हिडीओ शुटिंग केल्याच्या कारणावरून बुधवार दि.११रोजी सायंकाळी पाच वाजता एका समाजाच्या बाहेरून आलेल्या व स्थानिक दोनशे ते अडीचशे लोकांच्या जमावाने कारखान्यावरील त्यांच्याच परंतु, जातीतून बहिष्कृत केलेल्या वीस ते पंचवीस जणांना जबर मारहाण केली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीगोंदा कारखान्यावर बुधवारी एका समाजातील लोकांची जातपंचायत भरली होती. कारखान्यावरील ज्या कुटुंबाना जातीतून बाहेर काढले. त्यातील काही महिला त्यांच्या घरांतून ही जात पंचायत पाहत होत्या. तर एकजण जातपंचायत सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन या जातपंचायतीची शुटिंग काढत होता. शुटिंग केल्याचा राग आल्यामुळे जातपंचायतीमधील लोकांनी त्या मुलाला मारहाण केली. 


मारहाण करणारे बीड, पुणे जिल्ह्यातील ओझर, धामणगाव येथील होते. तसेच काही स्थानिकांसह जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी या कारखान्यावरील या वस्तीवर हल्लाबोल करत तलवार, लोखंडी गज, दगडाने मारहाण जबर मारहाण केली. येथील काही तरुण कामानिमित्त बाहेर.गेल्याने घरी असलेल्या पंचवीस ते तीस महिला पुरुष व मुलांना जबर मारहाण केली. या मारहाणीत अनेकांच्या हाताला, पायाला, डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. 
Loading...

यातील आठ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. तर इतरावंर काष्टी येथे उपचार सुरू आहेत. व्यंकट बाबू काकडे , उत्तम बाबूराव काकडे, रामदास गंगाराम मले, गंगाराम हनुमंत पालवे, भाऊसाहेब गंगाराम पालवे, कान्हू बाबू गायकवाड,बाबाजी कान्हू गायकवाड, रमा गायकवाड, सोनाली रमा गायकवाड, शालन गोविंद पालवे, रावसाहेब पालवे, सुरेश भीमा पालवे, सुभाष काकडे, बायडाबाई फूलमाली, साहेबराव काकडे, अशोक पालवे,अलका मले या सर्व जखमींवर श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथे पाठवले आहे.यातील आठ जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांचे दुर्लक्ष,गांभीर्याने न घेतल्याने वाद.  
या जातपंचायतीबाबत दुपारीच श्रीगोंदा पोलिसांना माहिती दिली होती. मात्र त्यांनी ही बाब गांभीर्याने न घेतल्याने ही घटना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर कदाचित ही मारहाण टळली असती. तसेच घटना घडुनही पोलिस उशिराने घटनास्थळी आल्याचे जखमी महिलांनी सांगितले..

ग्रामीण रुग्णालयातून तलवार जप्त.
दोन गटाच्या जमावात तलवार, गज व इतर धारदार शस्त्रे वापरली आहेत.या गुन्ह्यात वापरली गेलेली तलवार एकाने ग्रामीण रुग्णालयात आणली होती. याच तलवारीने आम्हाला मारहाण केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ती तलवार जप्त केली. .

राखीव पोलिस दल तैनात.
दरम्यान या घटनेमुळे कारखाना परिसरात प्रचंड तनावग्रस्त परिस्थिती आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून,राज्य राखीव पोलिस दलासह कर्जत,जामखेड येथून अतिरिक्त पोलिस कुमक तैनात केला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.