जुन्या बेवारस दुचाकीच्या लिलावातून दहा लाखांची कमाई !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सुपे पोलीस ठाण्याने केला 76 दुचाकी व 7 चारचाकी वाहनांचा लिलाव सुपे – पारनेर तालुक्‍यातील सुपे पोलीस ठाण्यात गेल्या दहा वर्षांपासून अनेक वाहने पडून होती. सन 2010 च्या आधी सुप्याचा कारभार पारनेर पोलीस ठाण्यांतर्गत चालविण्यात येत होता. तेव्हापासून महामार्गावर बेवारस वाहने मिळून येत होती. अखेर सर्व गाड्यांचा 28 जून रोजी दुपारी लिलाव करण्यात आला. 


Loading...
या लिलावातून शासनाला दहा लाखांची कमाई झाली आहे. नगर-पुणे महामार्गाशेजारी सुपे येथे पोलीस ठाण्याची स्थापना मे 2010 साली करण्यात आली होती. मात्र, जागेची अडचण भासू लागल्याने औद्योगिक वसाहतीत नव्याने पोलीस ठाण्याची इमारत बांधून कामकाज सुरळीत झाले. मात्र, जुन्या पोलीस ठाण्यात बेवारस गाड्यांचा खच पडलेला होता. 

सर्व कंपन्यांच्या 76 मोटारसायकली, चारचाकी 7 वाहने व एक कंटेनरचा यात समावेश होता. सन 2013 मध्ये वाडेगव्हाण शिवारात पाच कंटेनर भरून अनधिकृत चंदनसाठा पोलिसांनी पकडला होता. त्यातील सर्व आरोपी पारनेर तालुक्‍यातील होते. कंटेनर मालकाचा शोध लावून न्यायालयामार्फत निविदा देण्यात आली होती. त्यातील एक कंटेनर बेवारस राहिल्यामुळे तो पोलीस ठाण्यात पडून होता. 


पोलीस प्रशासनाने या बेवारस वाहनांचा लिलाव केला. जिल्ह्यातील 36 व्यापाऱ्यांनी त्यात सहभाग नोंदविला. हा लिलाव काल (दि. 28) दुपारी नागरिकांसमोर जाहीररीत्या करण्यात आला. श्रीरामपूर भागातील राजू शहा यांनी दहा लाख रुपयांना लिलाव घेतला. 


या वेळी सहायक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहायक फौजदार तुकाराम काळे, नागरिक उपस्थित होते. बेवारस वाहनांच्या लिलावामुळे जुन्या पोलीस ठाण्याचा श्‍वास मोकळा होणार आहे. पोलीस ठाणे औद्योगिक वसाहतीत गेल्यामुळे जुने पोलीस ठाणे ओस पडले आहे. नव्याने सुशोभिकरण करून ते वापरात आणावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.