राहुरीत मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा खूनच, आरोपीस २४ तासात अटक !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील वळण येथे शुक्रवारी सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ही महिला संगमनेर तालुक्यातील मालदाड रोड येथील आहे. याप्रकरणी सुकेवाडी येथील एकास अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 


Loading...
याप्रकरणी राहुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शुक्रवारी वळण येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचा खून केलेला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. तपास केल्यानंतर या महिलेचे नाव ज्योती राधाकिसन सातपुते (वय ३५) असून ती संगमनेर येथील मालदाड रोडला राहात असल्याचे समोर आले होते. 

पोलिसांनी महिलेचा पती राधाकिसन देवराम सातपुते यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर यातील संशयित गणेश किशोर गोसावी (वय ४०, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) यास ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे अधीक तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्यास अटक करण्यात आली आहे.


याप्रकरणी या महिलेचा गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने प्रेत वळण ते मांजरी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात टाकले, अशा आशयाची फिर्याद सोमनाथ गोरक्षनाथ डमाळे व वळणचे पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योती ही घरातून बॅलन्स टाकून येते म्हणून गेली व रात्रभर घरी आलेली नव्हती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. दुसऱ्या दिवशी तिचे प्रेत वळण येथे आढळून आले, असे तिच्या बहिणीने सांगितले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.