नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सत्ताधाऱ्यांची भंबेरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर नगरपंचायतीतील सत्ताबदलानंतर प्रथमच नवीन कारभाऱ्यांनी सर्व प्रभागांतील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी नगराध्यक्ष वर्षा नगरे व उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत सभागृहात जनता दरबार घेतला. नागरिकांच्या प्रश्नांची उत्त्रे देताना सत्ताधाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. 

याप्रसंगी मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी, नगरसेवक नंदकुमार देशमुख, विशाल शिंदे, नंदकुमार औटी, नगरसेविका मालन शिंदे, विजेता सोबले, संगीता औटी, शेरकर आदी उपस्थित होते. नगरसेवक नंदकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले. मागील सत्तेत असताना गुपचूप ग्रामसभा होत असता असा गौप्यस्फोट त्यांनी केला. 

नागरिकांनी प्रभागातील समस्या मांडल्या. तुषार औटी यांनी नवे अमरधाम हलवून संगमेश्वर घाटावर करण्याचे सूचवले. जामगाव रस्त्यावरील अमरधामची दुरुस्ती करण्याची मागणीही त्यांनी केली. भाऊसाहेब चौरे यांनी टेलिफोन ऑफिसच्या पाठीमागे साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगितले. संभाजीनगरमधील सहदेव घनवट यांनी पथदिव्यांचा मुद्दा मांडला. 

मोजक्या लोकांच्या घरावर उजेड पडेल, असे दिवे लावल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सुभाष कापरे यांनी नगरपंचायतीच्या जागेतील अतिक्रमण काढण्याची व कान्हूर पठार रस्त्यावर पथदिवे बसवण्याची मागणी केली. भैरवनाथगल्लीतील प्रवीण औटी यांनी मंदिरासमोरील गटारावर जाळी बसवण्याची मागणी केली. 

शहरात सार्वजनिक शौचालय बांधावे, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयासमोरील गटारीचा मुद्दा उपस्थित करताना भाऊसाहेब खेडेकर म्हणाले, काम अर्धवट झाले आहे. ते पूर्ण करावे. पिण्याचे पाणी वाया जाऊ नये, म्हणून नळांना तोट्या बसवण्यात याव्यात व मीटरने पाणी द्यावे. 

नगरपंचायतीशेजारील मटनविक्रेते टेलिफोन ऑफिस पाठीमागे कोंबड्यांचे मांस टाकतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे सुमन औटी म्हणाल्या. सुभाष औटी यांनी धोकादायक इमारतींना नोटीस देऊन त्या उतरवण्याची मागणी केली. आठवडे बाजारात व्यापारी शहरातील शेतकऱ्यांना बसायला जागा देत नाहीत. व्यापारी वर्गाकडून कर स्वरुपात वसुली करावी, असे ते म्हणाले. 
Loading...

टेकवस्ती येथील सुनीता कावरे यांनी जलवाहिनी तीन महिने बंद असल्याचे सांगितले. लवकरात लवकर नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तीन महिन्यांतून एकदा जनता दरबार भरवला जाईल, असे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी सांगितले. 

सत्ताबदलानंतर प्रथमच कारभाऱ्यांचा जनता दरबार टपऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार नगरपंचायतीशेजारी अतिक्रमण करून बांधलेल्या टपऱ्यांचे पुनर्वसन ठराव घेऊन करण्यात येईल. सार्वजनिक विहिरीशेजारील इंदिरानगर भागातील शौचालयाचे पाणी मनकर्णिका नदीत मिसळले जाते. त्यामुळे ते पाडण्यात येईल, असे या बैठकीत सांगण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.