लग्नाचे नाटक करून १२ तरुणांना गंडवले,टोळीचा पर्दाफाश.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  बनावट विवाह करून तरुणांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता त्यांच्याकडून फसवले गेलेले राज्यभरातील बारा तरुण शहर पोलिसांकडे कैफियत घेऊन आले आहेत. त्यांच्याकडून या टोळीने लाखो रुपये उकळले आहेत. 

फसवणूक झालेल्या तरुणांमध्ये सुनील खंडू शिंदे (पुणतांबे, ता. राहाता), राजू गंगाराम मोहिते (बापतरा, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), कृष्णा विठ्ठल जाधव (चाळीसगाव) व गौतम अशोक वाव्हळ (जळगाव), साहेबराव माळी (चाळीसगाव), गणेश माळी (खेडगाव, चाळीसगाव), कैलास महाजन (खेडगाव, चाळीसगाव), सुखलाल महाजन (दसके बर्डी, चाळीसगाव) यांचा समावेश आहे. 


किशोर एकनाथ पगार (पांगरी, ता. सिन्नर) या तरुणाकडून ५० हजार रुपये घेऊन त्याच्याशी एका तरुणीचा विवाह लावण्यात आला. तीन दिवसांनंतर बनावट नवरी व कलवरी झालेल्या तिच्या आईने पलायन केले. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दखल घेतल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात जाकीर ऊर्फ बाळासाहेब बबन पठारे, नवरी प्रियंका प्रकाश रोकडे, आई अनिता प्रकाश रोकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.Loading...
त्यानंतर तिघांसह आणखी एक महिला कुंदा कैलास शिंदे हिला अटक झाली. या रॅकेटने अनेकांना लुबाडले असल्याचे पुढे आले. मुख्य सूत्रधार बाळासाहेब पठारे हा जाकीर, जॅकी ही टोपणनावे वापरतो. अशी सहा लग्न लावल्याची कबुली त्याने दिली. प्रत्येकाकडून पन्नास हजार ते एक लाख रुपये त्याने घेतले. 

तीन तरुणी नवऱ्याबरोबर नांदत आहेत, तर तिघी नांदत नसल्याचे त्याचे म्हणणे होते. प्रत्यक्षात फसवणूक झालेले बारा जण पोलिसांपुढे हजर झाले. त्यांच्याकडून प्रत्येकी ५० हजार ते १ लाखापर्यंत रक्कम घेऊन विवाह लावण्यात आले. 


विवाहानंतर काही दिवसांतच नवरीने दागिन्यांसह पलायन केले, असे या तरुणांनी पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये आणखी काही महिला असून त्यांची नावे बनावट आहेत. फसवणूक झालेले चार तरुण मंगळवारी पोलिसांसमोर आले. त्यांनी फसवणुकीच्या प्रकाराचे किस्से सांगितल्यानंतर पोलिसही थक्क झाले. 


आरोपी प्रियंकाने कविता जगताप, हिराबाई हतांगळे, मनीषा पठारे, कविता गायकवाड, प्रियंका शिंदे, कविता डमाळे, वंदना शिंदे, अर्चना कांबळे आदी नावांचा वापर करून तरुणांना गंडा घातला. तिची आई अनिता हिने प्रत्येक वेळी वेगवेगळे नाते सांगून बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले


एकूण बारा तरुणांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून त्यातील काही जण न्यायालयात हजर झाले. त्यांना या खटल्यात साक्षीदार केले जाणार असून ज्या ठिकाणी विवाह लावण्यात आले तेथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. निरीक्षक संपत शिंदे तपास करत आहेत. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.