जामखेडमध्ये मागील भांडणाच्या कारणावरून तलवार व लोखंडी रॉडने हल्ला; दोघे जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मागील भांडणाच्या कारणावरून जामखेड-बीड रोडवरील पेट्रोल पंपाजवळ कारमधुन आलेल्या पाच जणांनी लघुशंकेसाठी थांबलेल्या अशोक पठाडे व संतोष गव्हाळे यांच्या मोटारसायकलला अडवून तलवार व लोखंडी रॉडने दोघांवर हल्ला करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध आर्म ॲक्टसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवार दि. ९ रोजी अशोक महादेव पठाडे (वय ३० वर्षे, रा. नाळवंडी ता पाटोदा. जि. बीड) हे मागील केस संदर्भात जामखेड येथील आपल्या वकीलांकडे विचारपुस करण्यासाठी आले होते. या नंतर सायंकाळी बीड कॉर्नरला आपल्या गावी नाळवंडीला जाण्यासाठी बसची वाट पाहात बसले असताना यावेळी त्यांचा मित्र संतोष गव्हाळे (रा.जामखेड) हा भेटला असता अशोक याने त्याला साकत फाटा येथे सोडण्यासाठी सांगितले. 

Loading...
त्यामुळे दोघेही सायंकाळी साडेसात वाजता मोटारसायकलवर बसुन चालले होते. बीडरोड येथील पेट्रोल पंपाच्या अलीकडे वडाच्या झाडाजवळ हे दोघे लघुशंकेसाठी थांबले असता पठाडे यांच्या गावातील इकबाल जानमहंम्मद पठाण व खान सर (पुर्ण नाव माहीत नाही, दोघेही रा.नाळवंडी. ता पाटोदा) यांच्यासह पाच जण हे चारचाकी गाडीने तलवार, लोखंडी रॉड व दांडके घेऊन आले. 

माझ्या वडिलांना का मारले असे म्हणून तलवारीने हल्ला केला तसेच पठाडे यांचा मित्र संतोष गव्हाळे हा मध्यस्थी करत असताना त्याला देखील इतर तिघा जणांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

वैद्यकीय अधिकारी युवराज खराटे यांनी तात्काळ जखमींवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर जखमींना नगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यावेळी जखमींना पाहण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. यातील पाचही आरोपी सध्या फरार असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.