कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच टोल फ्री नंबर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेद्वारे कर्जमाफीचा आतापर्यंत लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच एक टोल फ्री नंबर सुरू करण्यात येईल, अशी घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याविषयी मागणी केली होती. एक वर्षात कर्जमाफीचा लाभ आतापर्यंत केवळ ३७ लाख ७८ हजार लोकांना झाला. उर्वरित शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहिले आहेत. अनेकांना कर्जमाफीचा बॅंकेतून मेसेज येतो. परंतु त्यासाठीची चौकशी करण्यासाठी गेले असता बॅंकेत कर्जमाफी झाली नसल्याचे सांगतात. 
Loading...

यामुळे कर्जमाफीसाठी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता, त्यात ते पात्र ठरलेले आहेत की नाही याची त्यांना एकाच फोनवर माहिती मिळावी यासाठी एक टोल फ्री नंबर देण्यात यावा अशी मागणी मुंडे यांनी केली. त्यावर सहकार मंत्र्यांनी लवकरच एक टोल फ्री नंबर सुरू केला जाईल अशी घोषणा केली.

 राज्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरलेल्या अखेरच्या शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. जे शेतकरी या कर्जमाफी योजनेच्या निकषांत बसले नाहीत अथवा ज्यांच्या अर्जांमध्ये काही तांत्रिक त्रूटी राहिलेल्या आहेत, त्यांच्यासाठी तालुका स्तरावर सहायक निबंधकाच्या अंतर्गत समिती काम करत असून त्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.