नगर लोकसभा मतदारसंघ : शरद पवार यांच्या भूमीकेकडे लक्ष.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी निश्‍चित झाली असून जागा वाटप आठवडाभरात होईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अलिकडेच स्पष्ट केल्यामुळे नगर लोकसभा मतदारसंघ जागेचा विषय ऐरणीवर आला आहे. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी या मतदारसंघातून जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे असलेला हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीकडे राहणार की कॉंग्रेसला सोडण्यात येणार, याकडे लक्ष लागले आहे. Loading...
जिल्ह्यात नगर व शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ असून दोन्ही कॉंग्रेसच्या जागा वाटपात  नगर राष्ट्रवादीकडे तर शिर्डी कॉंग्रेसच्या वाट्याला आहे. नगर मतदारसंघ खुला आहे. शिर्डी अनुसूचित जातींसाठी आरक्षित असल्याने उत्तरेतील कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यांची विशेषत: विखेंची मोठी अडचण झाली आहे. 

त्यामुळे डॉ. सुजय विखे यांनी गेल्या  दोन वर्षापासून नगर दक्षिण जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. आरोग्य शिबिरे तसेच इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेली निवडणुकीची मोर्चेबांधणीही लपून राहिलेली नाही. 


शिवाय, या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचेही त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे घ्यावा, अशी मागणी राहुल गांधी व अशोक चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचेही कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी सांगितले आहे.  

हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला असून राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी सहा ते सात जणांची नावे असली तरी, प्रताप ढाकणे वगळता राष्ट्रवादीचा कोणताही नेता लोकसभेची तयारी करताना दिसत नाही. मात्र, अजित पवार या मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवून आहेत. 


त्यामुळे जागा वाटपात अजित पवारांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. शरद पवार व राधाकृष्ण विखे यांचे ‘राजकीय सख्य’ सर्वश्रूत आहेत. त्यामुळे शरद पवार या जागेबाबत काय निर्णय घेतात, याकडे दोन्ही कॉंग्रेसचे लक्ष लागले आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.